शैलेश नवाल : रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन
वर्धा : विदेशात वाहतूक नियमांचे पालन करण्याची संस्कृती असून आपल्या देशात नियमांचे पालन करण्यापेक्षा उल्लंघन करण्याचीच वृत्ती दिसून येते. वाहतूक नियमांना कायदा न मानता त्याला संस्काराच्या स्वरूपात स्वीकारल्यास देशातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त मिळून अपघाताच्या प्रमाणात घट होईल. सदर समाज हितार्थ कृतीतून आपण आपला व दुसऱ्यांचा जीव वाचवू शकतो. तरूणांसह नागरिकांनी वाहतुक नियमांना संस्कार म्हणून स्वीकारणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी विकास भवन येथे आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने २८ व्या रस्ता सुरक्षा पंधरवाड्याचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. एस. इलमे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी नवाल पुढे म्हणाले, वाहतूक नियम बनविण्यामागे तर्कशास्त्र आहे. त्याची माहिती करून घेत विद्यार्थ्यांसह नागरिकंनी स्वत: नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, तसेच दुसऱ्यांनाही नियमांचे पालन करण्यासाठी प्रेरीत करावे. तरूणांना वेग आणि शॉर्टकट आवडतात. मात्र, वाहन चालविताना दुसऱ्यांशी स्पर्धा न करता दुसऱ्यांच्या आयुष्याचे मोल लक्षात घेऊन वाहन कायद्याच्या नियमांचे पालन करूनच वाहन चालवावे. त्यामुळे संभाव्य धोका टाकता येतो असे त्यांनी सांगितले.
इलमे यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नवीन-नवीन गोष्टी शिकण्याबरोबरच वाहन चालविणे शिकले पाहिजे; पण वाहन चालविण्याबरोबर वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यास अपघाताची भीती असते. अपघातामुळे अनेकांना कायमचे अपंगत्व आले असून अनेकांना जिवाला मुकावे लागते आहे. परिणामी, प्रत्येकाने वाहतूक नियम पाळावे असे ते म्हणाले.
डॉ. राठोड यांनी अपघातग्रस्त नागरिकांना लगेच उपचार मिळाल्यास त्याचा जीव वाचू शकतो. जिल्ह्यात रूग्णवाहिकांनी आतापर्यंत ६२५ अपघातातील रूग्णांना सेवा देऊन त्यांचा जीव वाचविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावल्याचे त्यांनी सांगितले. गरजेच्या वेळी १०८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी जनजागृती रॅली काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखविलेल्या जनजागृती रॅलीने शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमन केले.(शहर प्रतिनिधी)