टॉवर ठरताहेत माकडांना सुरक्षित ठिकाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 11:50 PM2018-01-20T23:50:17+5:302018-01-20T23:50:28+5:30

सध्या शेती हिरवीगार झाली आहे. चणा, गहू व काही प्रमाणात कपाशी, तूर ही पिके शेतात आहेत. परिसरात चणा, गव्हाचे पीक बहरल्याने शेतकऱ्यांना अधिक उत्पन्नाची अपेक्षा आहे; पण माकडांच्या उपद्रवामुळे सदर पिकांचे नुकसान होत आहे.

Tower is the safest place for the monkeys | टॉवर ठरताहेत माकडांना सुरक्षित ठिकाण

टॉवर ठरताहेत माकडांना सुरक्षित ठिकाण

googlenewsNext
ठळक मुद्देपिकांचे नुकसान : शेतात घालतात धुमाकूळ

लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जा.) : सध्या शेती हिरवीगार झाली आहे. चणा, गहू व काही प्रमाणात कपाशी, तूर ही पिके शेतात आहेत. परिसरात चणा, गव्हाचे पीक बहरल्याने शेतकऱ्यांना अधिक उत्पन्नाची अपेक्षा आहे; पण माकडांच्या उपद्रवामुळे सदर पिकांचे नुकसान होत आहे. परिणामी, शेतकरी त्रस्त आहेत.
चिकणी, पडेगाव शिवारात मोठ्या प्रमाणात अति उच्च विद्युत दाबाच्या टॉवरची उभारणी करण्यात आली आहे. सदर टॉवर माकडांचे निवासस्थानच झाले आहे. माकड टॉवरवरच ठाण मांडून बसतात. शेतकरी शेतात असेपर्यंत माकड टॉवरच असतात; पण शेतकरी शेतातून निघताच माकडांचा पिकांमध्ये धुडगूस सुरू होतो. यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. टॉवरवरून हुसकावण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर करतात; पण माकडांवर याचा काहीही परिणाम होत नाही. शेतकरी टॉवरवर चढू शकत नसल्याने बांबूचा वापर करून माकडांना टॉवरवरून उतरविण्याचा प्रयत्न केला जातो; पण माकड बांबू पाहून पुन्हा वर चढतात. फटाकेही फोडले जातात. त्या आवाजाला माकडे घाबरतातही; पण केवळ इकडून तिकडे हालचाल करतात. टॉवरच्या खाली उतरत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा व झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
अस्मानी व सुल्तानी या दोन्ही संकटानी यंदा शेतकरी खचला आहे. सोयाबीन परतीच्या पावसाने गेले तर कपाशी बोंडअळीने फस्त केले. तुरीही अल्पावधीतच वाळत आहेत. आता चणा, गहू वन्य प्राण्यांच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याने शेतकरी हताश झाला आहे. शासनाकडून शेतमालाला खर्चानुसार भावही मिळत नसल्याची ओरड शेतकऱ्यांतून होत आहे.

Web Title: Tower is the safest place for the monkeys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.