ठळक मुद्देबस वेळेवर येत नसल्याने शिक्षणाचा खेळखंडोबाबसचा थांबा नसल्यानेही अडचण

आॅनलाईन लोकमत
वर्धा: आजवर अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना वा अन्य संघटनांनी केलेली रास्ता रोको आंदोलने आपण पाहिली आहेत. मात्र आज, गुरुवारी वर्धा जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर ठाण मांडून केलेले रास्ता रोको आंदोलन हे बहुदा असे पहिलेच आंदोलन असावे. या आंदोलनामागचे कारण म्हणजे, गावखेड्यातून येणाऱ्या या विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहचता येत नाही किंवा काही विद्यार्थ्यांना त्यांच्या गावात बसचा थांबा हवा आहे असे होते.
तळेगाव आष्टी राज्य मार्गावर सुजातपूर, ममदापूर, शिरकुटनी या गावांवरून बस जाते मात्र ती या ठिकाणी थांबत नाही, काही ठिकाणी बस थांबते पण ती तिथे दररोज किमान अडीच ते तीन तास उशीरा येते या कारणांमुळे येथील शाळकरी विद्यार्थी त्रस्त झाले होते. कित्येकदा त्यांना शाळेत सुरू असलेल्या परीक्षेलाच मुकावे लागते. गुरुवारी सकाळी याच समस्येची पुनरावृत्ती झाली. मोर्शी आगाराची बस आली मात्र ती थांबली नाही. मग या चिमुकल्यांनी थेट लोकशाहीतील आंदोलनाचा मार्ग स्वीकारून गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास रस्त्यावरच ठाण मांडले व वाहतूक ठप्प केली. त्यांच्या आंदोलनाची माहिती कळताच गावकरीही त्यांच्या मदतीला धावले. या आंदोलनादरम्यान आर्वी आगाराची एक बस तेथे थांबली व त्यात काही विद्यार्थ्यांना जाता आले पण उर्वरित विद्यार्थी रस्त्यावरच बसून राहिले. मात्र त्यांच्या या आंदोलनाची प्रशासन वा कुठल्या राजकीय पक्षाने दखल घेतल्याचे दिसले नाही. यावेळी गावकऱ्यांनी परिवहन मंत्र् यांना निवेदन पाठविल्याचे सांगण्यात आले.