वर्धा- विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मंगळवारी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भूमिपुत्र संघर्ष वाहिनीच्या नेतृत्त्वात शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचं नेतृत्व भूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे अध्यक्ष अभिजित फाळके यांनी केलं.

या मोर्चाच्या माध्यमातून सोयाबीनला प्रती क्विंटल ५ हजार रुपये, कापसाला प्रती क्विंटल ७ हजार रुपये भाव जाहीर करावा. शिवाय कुठल्याही कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भावापेक्षा कमी भाव दिल्या जात असल्यास त्या व्यापाऱ्यांविरुद्ध कठोर कार्यवाही करीत त्याचा परवाना रद्द करावा, शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवण्यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलावी. ओलितासाठी शेतीपंपाला दिवसाला किमान १२ तास विद्युत पुरवठा देण्यात यावा, शेतमाल विक्रीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया रद्द करावी. नरभक्षक वाघिणीच्या आकस्मिक मृत्युला जबादार ठरवून कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे वनविभागाने मागे घ्यावे, विविध शेतोपयोगी साहित्यावर वस्तुसेवा कर लावण्यात आला आहे. शेतोपयोगी साहित्याला तात्काळ वस्तुसेवा करातून मुक्त करण्यात यावे, अशा विविध मागण्याचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. मोर्चात मनोज चांदूरकर, सुधीर पांगुळ, प्रशांत देशमुख, अतुल पाळेकर यांचा सहभाग होता.