Ra.co. The leader came down and bowed down to the master | रा.काँ. नेते झाले महात्म्यापुढे नतमस्तक

ठळक मुद्देसुप्रिया सुळे यांनी जाणून घेतली आश्रमाची माहिती

आॅनलाईन लोकमत
सेवाग्राम : शांती आणि अहिंसेचा संदेश देणारे व जगासाठी प्रेरणास्थान असलेल्या महात्मा गांधी आश्रमात राष्ट्रवादी काँगे्रसची हल्लाबोल पदयात्रा बुधवारी पोहोचली. याप्रसंगी आश्रमद्वारे मार्गदर्शिका संगीता चव्हाण यांनी खा. सुप्रिया सुळे यांचे सुतमाळ व सेवाग्राम आश्रमाचे पुस्तक देऊन स्वागत केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँगे्रसच्या नेत्यांनी महात्मा गांधी यांच्यासमोर नतमस्तक होत प्रार्थनेत सहभाग घेतला.
याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. राजेश टोपे, गुलाबराव देवकर, ख्वाजा बेग, चित्रा वाघ, विद्या चव्हाण, माजी आमदार गुलाबराव गावंडे, प्रा. सुरेश देशमुख, प्रा. राजू तिमांडे, प्रवक्ता विलास लवांडे, संदीप बाजोरिया, गणेश दुधगावकर, महेश तपासे, शंकर अण्णा धोंडगे, समीर देशमुख, सुनील राऊत यासह उपस्थितांनी आश्रमाची पाहणी करीत माहिती घेतली. यानंतर बापूकुटीसमोर बकुळीच्या झाडाखाली सर्वधर्म प्रार्थना, भजन झाले. आश्रमचे नामदेव ढोले, सिद्धेश्वर उमरकर, बाबा खैरकर, प्रशांत ताकसांडे, शंकर वाणी, सुधीर मडावी, सचिन हुडे, जानराव खैरकर, आकाश लोखंडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रपाल गणविर, अनिल भोगे, पं.स. सदस्य भारती उगले, बघेल, देशमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सुप्रिया सुळे ठरलेल्या वेळेत आश्रमात आल्या. सर्वांशी संवाद साधला. चौकशी व चर्चा केली. यातून त्यांचा दिलदारपणा दिसून आल्याची चर्चा होती.
भेट पुस्तिकेत नोंदविला अभिप्राय
आश्रम भेट पुस्तिकेतील खा. सुप्रिया सुळे यांनी अभिप्राय नोंदविला. यात ’हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने आज सेवाग्राम येथील बापुकुटीमध्ये येणे झाले. सकाळच्या प्रार्थनेत सहभागी झाले. याचे खूप समाधान वाटते. येथील शांत व पवित्र वातावरणात खरोखरच मनाला एक प्रकारची शांती लाभते, याचा प्रत्यय आला. येथील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधता आला, याचाही मला आनंद आहे. महात्मा गांधीजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन’!