राजकारण्यांनी संवेदनशील असणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 09:44 PM2019-01-05T21:44:09+5:302019-01-05T21:44:39+5:30

सर्वच व्यक्तीत चांगला माणूस दडला असतो. त्याच्यातील चांगुलपणा समोर येऊन समाजात आदर्श निर्माण व्हावा यासाठी संवेदनशील असणे गरजेचे आहे. राजकारण हे निवडणुकीपुरते असावे.

Politicians need to be sensitive | राजकारण्यांनी संवेदनशील असणे गरजेचे

राजकारण्यांनी संवेदनशील असणे गरजेचे

Next
ठळक मुद्देमकरंद अनासपुरे : आर्वीत कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : सर्वच व्यक्तीत चांगला माणूस दडला असतो. त्याच्यातील चांगुलपणा समोर येऊन समाजात आदर्श निर्माण व्हावा यासाठी संवेदनशील असणे गरजेचे आहे. राजकारण हे निवडणुकीपुरते असावे. त्यानंतर सर्वांनी विकासासाठी एकत्र येत आपला सहभाग द्यावा, त्यासाठी राजकारण्यांनी संवेदनशीलता बाळगणे गरजेचे आहे. संवेदनशीलता बाळगणारे राजकारणी आमचेही सहकारी मित्र राहणार, असे प्रतिपादन प्रसिद्ध मराठी सिने अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी केले.
स्थानिक जागृती क्रीडा मंडळाद्वारे आमदार डॉ. शरदराव काळे स्मृती कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महिला कॉँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चारुलता टोकस, विदर्भ कबड्डी स्पर्धेचे सचिव जितेंद्र ठाकूर, जि.प. च्या माजी अध्यक्ष कलावती वाकोडकर, स्वप्ना शेंडे, हरीश इथापे, राजू साळवे, माजी जि.प. सदस्य गजानन गावंडेसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आयोजक आमदार अमर काळे यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका विशद करीत मागील १८ वर्षांपासून आर्वीत स्पर्धा आयोजन करीत आहे, असे सांगत यातून खेळाडूंना प्रोत्साहन व नव्या पिढीत खेळ भावना रुजत असल्याचे सांगितले. मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनने आर्वी विधानसभा क्षेत्रातील धामनदीचे खोलीकरण करण्यास सहकार्य करावे, त्यासाठी आमची सहकार्याची भूमिका राहणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी अ‍ॅड. चारुलता टोकस, हरीश इथापे यांनीही विचार व्यक्त केले. आयोजकांच्या वतीने मकरंद अनासपुरे यांचा शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
अनासपुरे म्हणाले, सोशल मीडिया दुधारी तलवार आहे. युवकांनी याचा वापर विधायक कार्यासाठी करावा व आपल्या जगण्याचे ध्येय काय आहे, आपण आपल्या घरासाठी, समाजासाठी, देशासाठी जगतो का, या वास्तवात युवकांनी जगणे गरजेचे आहे. सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी व्हावा, असे सांगत पुढील काळात राजकारण्यांनी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची गरज आहे. अन्यथा पुढची पिढी आम्हाला माफ करणार नाही, कोणतेही काम मोठे नाही, परंतु काम मोठं झालं की, श्रेयवाद सुरू होतो. नाम फाऊंडेशन ही माणुसकीची, शेतकऱ्यांसाठीची चळवळ आहे. आपली संस्कृती शेतीपूरक असतानाही शेतकरी व्यावसायिक का होत नाही? अशी खंतही त्यांनी व्यक्त करीत नाम फाऊंडेशन पुढील काळात आंजी- येळाकेळी या ९ कि.मी. नदीचे खोलीकरण करणार असल्याचे सांगितले. यावेळी जागृती क्रीडा मंडळाचे खेळाडू अमोल जाधव, हिमांशू पाटील, रितेश डवरे, शुभम पोकळे, श्वेता रत्नपारखी, प्राची प्रधान व इतर खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार हस्ते करण्यात आला. संचालन अविनाश गोहाड यांनी केले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी ६ ला रात्री ८ वाजता सिने अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांच्या उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेत राज्यातील नामवंत संघ सहभागी झाले आहेत.
पीडित शेतकºयाला ‘नाम’चा मदतीचा हात
घोराड- सेलू येथे १ महिन्यापूर्वी अनिल शिंदे नामक शेतकऱ्याचा १ बैल मरण पावला होता. याविषयीची माहिती आधार संघटनेचे सेलू तालुकाध्यक्ष शुभम झाडे यांना मिळाली असता त्यांनी ही माहिती नाम फाऊंडेशनचे विदर्भ-खानदेश प्रमुख हरीश इथापे यांना दिली. दरम्यान, इथापे यांनी नामच्या वतीने १५ हजार रुपयांची मदत अनिल शिंदे यांना जाहीर केली. नाम फाऊंडेशनच्या वतीने सिने अभिनेते मकरंद अनासपुरे, आधार संघटनेचे विदर्भ अध्यक्ष जतिन रणनवरे, जिल्हाध्यक्ष विक्रम खडसे, विदर्भ उपाध्यक्ष पंकज ओरके, पृथ्वीराज शिंदे, संघटक प्रशांत झाडे, तालुका उपाध्यक्ष फैजानअली सय्यद यांच्या उपस्थितीती पीडित शेतकºयाला मदतीचा धनादेश देण्यात आला.

Web Title: Politicians need to be sensitive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.