पर्यावरणाला हानी : प्रशासनाकडून कारवाईबाबत उदासीनता
तळेगाव (श्या.पं.) : शासनाच्यावतीने गाजावाजा करून प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच शासनाकडून याविषयी जागृती केली जाते. मात्र कारवाई अभावी ही बंदी कागदोपत्री असल्याचा प्रत्यय तळेगाव येथील स्थिती पाहिल्यावर येते. येथील सर्व प्रमुख चौकात प्लास्टीक पिशव्यांचा खच पडलेला दिसून येतो.
पर्यावरणाला हानीकारक ठरणाऱ्या प्लास्टीक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. याकरिता कारवाईचे प्रावधान केले आहे. मात्र ही बंदी कागदोपत्रीच असल्याचे दिसून येत आहे. भाजीपाला, कापड दुकान, मिठाई, औषधी, हार्डवेअर, किराणा, फेरीवाले, फुलवाले यांच्याकडून ग्राहकांना सर्रासपणे प्लास्टीक पिशव्या दिल्या जातात. याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे या प्लास्टीक पिशव्यांचा कचराही निदर्शनास पडतो. पर्यावरण प्रदूषित करण्यास ही बाब कारणीभूत ठरत आहे. पूर्वी ही समस्या शहरी भागापर्यंत मर्यादीत होती. मात्र आता हे लोण ग्रामीण भागातही पसरले आहे. त्यामुळे ग्रामीण स्तरावर ग्रामपंचायत व तंटामुक्त समितीच्या माध्यमातून प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर कारवाईची मागणी होत आहे. यावर कठोर निर्बंध लावण्याची गरज व्यक्त आहे. या नियमाची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्यामुळे रस्त्याच्या कडेला, नालीत प्लास्टीक पिशव्याच आढळतात. येथे प्लास्टिक पिशव्यावरील बंदी नियमांची पायमल्ली होत आहे. या प्लास्टीक पिशव्या अविघटनशील असल्याने याापासून निर्माण झालेल्या कचऱ्याची समस्या गंभीर होत आहे.
जमिनीत पाण्याचा निचरा होत नाही. वनस्पतीच्या मुळांना बाधा पोहचते. अशा अनेक अडचणीमुळे प्लास्टीक पिशव्या या पर्यावरणाकरिता अडचण ठरत आहेत. पिशव्यांमध्ये केरकचरा भरून फेकल्यास त्या पिशव्या पाळीव जनावरे खातात. त्यामुळे जनावरांना आजार जडतात.
वाऱ्यामुळे पिशव्या अस्ताव्यस्त विखुरल्या जातात. गावातील लहान-मोठ्या नाल्या, गटारे या पाण्याचे पाऊच, गुटख्याच्या पन्न्या, पत्रावळी व प्लास्टीक पिशव्यामुळे तुंबल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडसर येतो. नाल्यांमधून पाणी प्रवाहित होत नसल्याने दुर्गंधी पसरते. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. याची दखल घेत कार्यवाही करणे गरजेचे ठरत आहे.(वार्ताहर)


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.