कृषी विभागाचा बंधारा गाळानेच ‘ओव्हरफ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 11:56 PM2019-01-23T23:56:16+5:302019-01-23T23:58:42+5:30

भूजल पातळीत वाढ होऊन सिंचनासाठी फायदा व्हावा या उद्देशाने शासनाने कृषी विभागाच्या वतीने छोट्या-मोठ्या नाल्यांवर सिमेंट बंधारे बांधण्यात आले. त्यानंतर काही बंधाऱ्यातील गाळ उपसण्यात आला, तर काही बंधारे गाळानेच ओव्हरफ्लो झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

'Overflow' by the Department of Agriculture | कृषी विभागाचा बंधारा गाळानेच ‘ओव्हरफ्लो’

कृषी विभागाचा बंधारा गाळानेच ‘ओव्हरफ्लो’

Next
ठळक मुद्देविहिरींच्या पाणीपातळीत घट : शेतकरी सिंचनापासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलगाव (लवणे) : भूजल पातळीत वाढ होऊन सिंचनासाठी फायदा व्हावा या उद्देशाने शासनाने कृषी विभागाच्या वतीने छोट्या-मोठ्या नाल्यांवर सिमेंट बंधारे बांधण्यात आले. त्यानंतर काही बंधाऱ्यातील गाळ उपसण्यात आला, तर काही बंधारे गाळानेच ओव्हरफ्लो झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
कारंजा तालुक्यातील धर्ती गावाच्या क्षेत्रात येणाऱ्या मौजा भालू शिवारातून वाहणाऱ्या नाल्यावर कृषी विभागाच्या वतीने रूपचंद मानमोडे यांच्या शेताजवळ १० वर्षाआधी बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली. या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांनी सिंचनासाठी केल्यामुळे त्यांच्या उत्पन्नात भर पडली. परंतु, मागील पाच वर्षांपासून या बंधाऱ्यातील गाळ न उपसल्यामुळे पावसाच्या पाण्याचा संचय होत नाही. पाणी पूर्णत: वाहून गेल्यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घट झाली आहे.
शासनाच्या जलयुक्त शिवारअंतर्गत नाला सरळीकरण व खोलीकरण करण्यात आले. परंतु, या नाल्याचे काम करण्यात आलेले नाही. या बंधाऱ्यातील गाळ काठापर्यंत भरलेला असूनही याकडे कुणाचेही लक्ष नाही.
शासन पाणी अडविण्यासाठी पाणी अडवा-पाणी जिरवा यासह अन्य उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करीत असताना हा भाग अपवाद कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नाल्यावर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातील गाळ काढून नाल्याचे खोलीकरण करण्यात यावे अशी मागणी होत आहे.
पाणीसंचयात बाधा
शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा व्हावी म्हणून बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. परंतु संबंधितांकडून नाल्यांची देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने बंधारे गाळयुक्त होत असून शेतकऱ्यांना सिंचनापासून मुकावे लागत आहे.

या बंधाऱ्यांच्या निर्मितीमुळे विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली होती. परंतु, बंधारा गाळाने भरल्यामुळे पाणी अडल्या जात नाही. त्यामुळे विहिरींची पातळी खालावली आहे. बंधाऱ्यांतील गाळ उपसण्यात यावा.
- रूपंचद मानमोडे, शेतकरी, धर्ती.

Web Title: 'Overflow' by the Department of Agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.