नागपुरी संत्र्याला आले सुगीचे दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:49 PM2018-10-23T23:49:14+5:302018-10-23T23:50:09+5:30

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची एकजुट आणि हमीभावाचा मुद्दा ऐरणीवर आल्याने कारंजा व मोर्शी संत्रा सुविधा केंद्रातील संत्र्याला देशात सर्वाधिक भाव मिळाला आहे.

Nagpuri orange was introduced in Sugake Day | नागपुरी संत्र्याला आले सुगीचे दिवस

नागपुरी संत्र्याला आले सुगीचे दिवस

Next
ठळक मुद्देकारंजा केंद्रावर यंदा सर्वाधिक भाव : संत्रा उत्पादकांना स्पेनच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची एकजुट आणि हमीभावाचा मुद्दा ऐरणीवर आल्याने कारंजा व मोर्शी संत्रा सुविधा केंद्रातील संत्र्याला देशात सर्वाधिक भाव मिळाला आहे. मागील तीन वर्षांपासून संत्रा उत्पादक संघटनेचे नेते श्रीधर ठाकरे यांनी विविध बदल घडवून व्यापाºयांच्या जाळ्यात अडकणाºया शेतकºयांना हमीभावाने संत्रा विक्रीची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे यंदा संत्रा उत्पादकांना चांगला भाव मिळत आहे. त्यातच स्पेन देशातील रेमॉन नेव्हिया यांना येथे बोलावून त्यांच्या मार्फत विदर्भातील संत्रा उत्पादकांना तंत्रशुद्ध आधुनिक स्वरूपाचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. रेमॉन नेव्हिया यांनी संत्रा उत्पादकांना कानमंत्र दिला असून त्यानुसार संत्र्याची गुणवत्ता वाढविण्यासाठी व संत्रा पिकाच्या हाताळणीबाबत मार्गदर्शन केले आहे.
संत्रावरील गुणवत्ता वाढविण्यासाठी काय-काय उपाय योजना केल्या पाहिजे यासाठी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, या भागातील वातावरण हे संत्र्यासाठी स्वर्ग आहे. त्यासाठी लागणारी कसदार जमीन, सूर्यप्रकाश, पाऊस, तापमान हे सर्व काही उत्तम आहे. या उलट स्पेनमध्ये जमीन रेताड क्षारपट-सामू वाढलेली, वर्षभरात २०० मिमी पाऊस पडतो व तापमानात अधिक चढ उतार असा प्रकार आहे. तरी सुद्धा स्पेन संत्रा पिकातील उत्पादन ६०-८० टन हेक्टर आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी आपल्याला काही सुधारणा कराव्या लागतील. यामध्ये प्रामुख्याने लागवडीच्या वेळेस काळजी, पानातील अन्नद्रव्य तपासणी, मातीतील अन्नदव्य तपासणी, अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन, छाटणी, फुलधारण वाढविणे, फळगळ, फळाला चिरा (क्रँकिंग) पडणे, अनियमित बहाराचे व्यवस्थापन, ताणग्रस्त परिस्थितीतील व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, फायटोप्थोरा (डिंक्या) रोगाचे व्यवस्थापन व वायबार कमी करणे या आहेत.
रोप लागवडीच्या वेळेस काय काळजी हवी यासाठी प्रचलित किंवा सघन लागवड पद्धतीत उंच गादी वाफा पद्धत अवलंबवावी. रोप लागवडीच्या वेळेस प्रत्येक रोपाला एक ड्रीपर येईल, असे नियोजन करावे. रोपाला ५० सेमी. उंच व १५ सेमी व्यास असलेला, आतून काळा व बाहेरून पांढरा असलेला प्लास्टिक पाईप बसवावा. त्यामुळे खोडाला येरे पानसोट काढण्याची गरज लागत नाही व झाडाची वाढ जलद होते. तसेच पाईप थंड राहल्यामुळे खोडाला इजा पोहचत नाही. यानंतर ६० सेमी उंचीवर तिरपा काप देऊन झाडाला २-३ फांद्या ठेवाव्यात.
पानातील अन्नद्रव्य तपासणी कशी करावी? यावर ते म्हणाले की, यासाठी पानातील अन्नद्रव्य तपासणी करण्याची योग्य वेळ म्हणजे जेव्हा झाडाला नवीन फूट किंवा नवती थांबलेली असते. जसे विश्रांती काळ व फळ वाढीचा काळ. त्यासाठी जास्त जुनी पान न घेता नवीन घ्यावीत. यामध्ये सुद्धा जास्त मोठी किंवा लहान पान न घेता एकसारखी पान घ्यावीत. एका झाडावरून चार दिशांची चार पान घ्यावीत. एका बागेतून २५-३० झाडावरून झिक-झॅक पद्धतीने पानाची नमुने घ्यावीत. पान कागदी लिफाफ्यातून प्रयोगशाळेत पाठवावी. अशा प्रकार दोन वेळेस पानातील अन्नद्रव्य तपासणी करावी. तसेच बहाराच्या आधी माती परीक्षण करून घ्यावे.
संत्रा पिकामध्ये छाटणी कशी करावी? यावरही त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, संत्रा पिकामध्ये दरवर्षी छाटणी करून फळ देणाºया फांद्या वाढवून, सरळवर जाणारे पानसोट काढणे गरजेचे आहे. संत्र्याच्या झाडाला सरळ वाढणाºया फांद्यापेक्षा आडव्या वाढणाºया फाद्यांना ३-४ अधिक फळधारणा होते. त्यामुळे झाडामध्ये मध्यभागी सरळ वर जाणाºया फांद्या काढून टाकाव्यात. त्यामुळे झाडामध्ये सूर्यप्रकाश येईल व आतील बाजूने (पेठ्यांमध्ये) फळधारणा होईल. आडव्या जाणाºया फांद्यावरील वर जाणाºया फांद्या काढाव्यात व खालील बाजुने जाणाºया फांद्या ठेवाव्यात. फांदीला काप देताना मुख्य फांदीच्या जवळ तिरपा काप द्यावा. त्यामुळे काप दिलेल्या ठिकाणी आतून गाठ तयार होणार नाही व जमिनीकडे जाणाºया आडव्या फांदीला जास्त प्रमाणात अन्नपुरवठा मिळतो. पानसोट वर्षातून २-३ वेळेस काढावेत. पानसोट काढण्याची योग्य अवस्था म्हणजे ते एका बोटाने सहज निघतील ही होय. मोठ्या झालेल्या पानसोटांना हलकेसे आडवे वाकवल्यास येणाºया बहराच्या वेळेस त्यांना चांगली फळधारणा होते. अशा प्रकारे छाटणी केल्यास झाडाचा आकार त्रिकोणी न होता दोन किडण्या जोडल्यासारखा होतो.
बहारातील अनियमितता कशी कमी करता येईल? याबाबत त्यांनी सांगितले की, ज्या वर्षी आपल्याला भरपूर उत्पन्न मिळतो, त्याच्या दुसºयास वर्षी आपल्याला फुल, फळधारणा व उत्पन्न कमी मिळते. याला बहारातील अनियमितता म्हणतात. याचे मुख्य कारण म्हणजे फळ काढणी नंतर झाडामध्ये कमी झालेली पालाशची कमी. यासाठी नेहमी फळ काढणी नंतर झाडावर पालाशच्या (ट्रायफॉस) दोन फवारण्या घ्याव्या. तसेच ज्या वर्षी भरपूर उत्पन्न मिळते. त्यानंतर फळ काढणी झाल्यावर दोन पालाश च्या फवारण्यामध्ये एक जिब्रेलिक अ‍ॅसिड ची १०-१५ पीपीएमची फवारणी घ्यावी अशी माहिती स्पेन देशातील रेमॉन नेव्हिया यांनी शेतकºयांनी कानमंत्र देतांना दिली आहे. यावेळी महाआॅरेंजचे संचालक राहुल श्रीधरराव ठाकरे उपस्थित होते.
संत्रा पिकांचे पाणी व्यवस्थापन असे करा ?
काळीची भारी जमीन बघता उंच गादी वाफ पद्धतीवर लागवड फायदेशीर ठरेल. सुरूवातीला ३ फुट रूंद व २ फुट उंच गादी वाफा तयार करून त्यावर लागवड करावी. यामुळे मुळांच्या कक्षेत वापसा राहून हवा खेळती राहील व मुळांची जल वाढ होईल. पाणी देण्यासाठी लागवडीच्या काळात एक ड्रीप लाईन वापरून एका झाडाजवळ १ ड्रीपर लावून पाणी व्यवस्थापन करावे. दोन वर्षापासून पुढे २ ड्रीप लाईनचा वापर करावा व गादी वाफ्याची रूंदी वाढवावी. त्यामुळे मुळांची झाडाच्या दोन्ही बाजूस चांगली वाढ होईल.

Web Title: Nagpuri orange was introduced in Sugake Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.