वृषभ राउत : वेगळ्या विदर्भाकरिता जाम आणि शिरपूर येथे आंदोलन
समुद्रपूर : एकटा विदर्भ पूर्ण महाराष्ट्रात होत असलेल्या वीज निर्मितीच्या प्रमाणात अध्यार्हुन अधिक वीज निर्मित करतो. तरी इथला शेतकरी भारनियमन झेलतो. विदर्भाच्या मुद्यावर निवडून आलेले पण सुस्तावलेले नेते याकडे लक्षपूर्वक कानाडोळा करून वैदर्भीय जनता खितपत जगत आहे. विदर्भाच्या मुद्यावर नेहमीच वैदर्भीयांची फसवणूक करतात हा मोठ्ठा विरोधाभास आहे, असे मत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे वृषभ राउत यांनी आंदोलकांपुढे व्यक्त केले.
जाम चौरस्त्यावर महिला पुरुष शेतकरी शेतमजूर व तरुणांनी राष्ट्रीय महामार्ग बंद केल्याने दोन तास चौतरफा वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलकांच्या नाऱ्यांनी जाम चौरास्ता दुमदुमुन निघाला. याची दखल शासनाने जर घेतली नाही तर पुढील आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. शंभरहुन जास्त महिला पुरुष आंदोलकांना यावेळी अटक करण्यात आली.
बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलीस कुमक, दंगल पथक, समुद्रपूर, हिंगणघाट, गिरड, वडनेर येथील पोलीस ठाण्याचे ठाणेदार व पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते. आंदोलनाकरिता शुभम वाढई, मधुसूदन हरणे यांच्यासह सदस्यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)