व्यापाऱ्यांच्या मनमर्जीचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:30 AM2018-04-07T00:30:31+5:302018-04-07T00:30:31+5:30

तालुक्याचे स्थळ असलेल्या देवळी येथील पुलगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसमितीत मोठ्या प्रमाणात शेतकरी कापूस विक्रीकरिता आणतात; पण येथील व्यापाऱ्यांच्या मनमर्जीमुळे सध्या कापूस उत्पादकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Mercenaries of distressed farmers | व्यापाऱ्यांच्या मनमर्जीचा शेतकऱ्यांना फटका

व्यापाऱ्यांच्या मनमर्जीचा शेतकऱ्यांना फटका

Next
ठळक मुद्देदेवळीतील प्रकार : वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : तालुक्याचे स्थळ असलेल्या देवळी येथील पुलगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसमितीत मोठ्या प्रमाणात शेतकरी कापूस विक्रीकरिता आणतात; पण येथील व्यापाऱ्यांच्या मनमर्जीमुळे सध्या कापूस उत्पादकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर प्रकरणी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.
शेतकऱ्यांचा कापूस उधारीत न घेणे हे क्रमप्राप्त असताना देवळीच्या उप बाजार समितीत व्यापारी चक्क उधारीत कापूस खरेदी करीत असल्याचे दिसते. याकडे कृउबासच्या सभापतींसह पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. उधारीत कापूस खरेदी करून अनेक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडीच झाल्याचा प्रकार यापूर्वी सेलू येथे घडला आहे. त्यामुळे भविष्यात कुठल्याही प्रकारे कापूस उत्पादक शेतकरी व्यापाऱ्यांकडून नाडल्या जावू नये यासाठी संबंधित यंत्रणेने तात्काळ योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. देवळी उप बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणारे काही व्यापारी थेट कापूस उधारीत खरेदी करीत आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्याकडून काही शेतकऱ्यांना चार दिवसानंतरचा तर काहींना तब्बल सुमारे १० दिवसानंतर धनादेशाद्वारे कापसाचा चुकारा दिल्या जात आहे. त्यामुळे उन्हाळवाहीच्या कामांना गती देणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी व्यापाºयांकडून केली जात असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.
शेतकºयांना कापूस विक्री केल्यानंतर पैशाची नितांत गरज असताना त्यांना पैशासाठी १० ते १२ दिवस थांबावे लागत आहे. इतकेच नव्हे तर कापसाची गाडी रिकामी करण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून प्रती क्विंटल १० रुपये रोख स्वरूपात घेतली जात आहे. पूर्वीच निसर्गाच्या लहरीपणा व बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशी उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यातच कापूस विक्रीकरिता आणल्यावर हा कापूस फरतड असल्याचे सांगत कापसालाही अल्प दर दिल्या जात आहे. हा संपूर्ण प्रकार पूर्वीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढविणारा असल्याने याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत चौकशी करून योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
गाडी रिकामी करण्याच्या नावाखाली प्रती क्विंटल १० रूपये
देवळीच्या बाजार समितीत कापूस विक्री करीता नेल्यावर शेतकऱ्यांकडून कापूस भरलेली गाडी रिकामी करण्याच्या नावाखाली प्रती क्विंटल १० रुपये घेतले जात आहे. परंतु, घेण्यात येणाऱ्या या पैशाची कुठलीही पावती शेतकºयांना दिली जात नाही. त्यामुळे हा पैसा कुणाच्या खशात जात आहे याबाबत शेतकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
शासकीय तूर खरेदीही कासवगतीनेच
देवळीच्या बाजार समितीच्या आवारात शासकीय तूर खरेदीही सुरू असल्याचे सांगण्यात येते. मात्र, आतापर्यंत केवळ ४३५ शेतकऱ्यांचीच तूर खरेदी करण्यात आली आहे. प्रत्येक तूर उत्पादकाच्या शेतमालाला शेतमाल विकतेवेळी योग्य भाव मिळावा यासाठी संबंधित यंत्रणेणे प्रयत्न करावे, अशी तूर उत्पादकांची मागणी आहे.

बाजार समितीत हमालांकरवी शासकीय धोरणानुसार शेतकऱ्यांकडून कापूस रिकामा करण्यासाठी प्रती क्विंटल १० रुपये घेत आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना कापसाचा चुकारा २४ तासाच्या आत देणे क्रमप्राप्त आहे. मार्च महिना राहिल्याने गत महिन्यात धनादेशाद्वारे कापसाचा चुकारा देण्यात विलंब झाला असावा. आतापर्यंत आपल्याकडे कुठल्याही शेतकऱ्यांची तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल.
- मनोहर खडसे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, पुलगाव.

Web Title: Mercenaries of distressed farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस