बँक आॅफ इंडिया बनावट सोने प्रकरणातील ठगसेन मंगेश साठे याला जालना येथून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 05:35 PM2017-12-12T17:35:43+5:302017-12-12T17:38:18+5:30

बँक आॅफ इंडियाच्या मोरांगणा शाखेत बनावट सोने तारण ठेवून बँकेला १ कोटी ४१ लाखांनी गंडा घालणारा मुख्य आरोपी मंगेश रामकृष्ण साठे हा अखेर खरांगणा पोलिसांच्या हाती लागला.

Mangesh Sathe arrested in Bank of India fake gold case from Jalna | बँक आॅफ इंडिया बनावट सोने प्रकरणातील ठगसेन मंगेश साठे याला जालना येथून अटक

बँक आॅफ इंडिया बनावट सोने प्रकरणातील ठगसेन मंगेश साठे याला जालना येथून अटक

Next
ठळक मुद्देतब्बल चार महिन्याने गवसला आरोपीसहभागी लोकांची नावे पुढे येणार

अरविंद काकडे।
आॅनलाईन लोकमत
वर्धा : बँक आॅफ इंडियाच्या मोरांगणा शाखेत बनावट सोने तारण ठेवून बँकेला १ कोटी ४१ लाखांनी गंडा घालणारा मुख्य आरोपी मंगेश रामकृष्ण साठे हा अखेर खरांगणा पोलिसांच्या हाती लागला. ठाणेदार निशीकांत रामटेके, शिपाई मनीष श्रीवास, सचिन पवार, राजेश शेंडे व सहकाऱ्यांनी त्याला जालना येथून ताब्यात घेतले.
ठगसेन साठे याने १६ लोकांच्या नावावर बनावट सोन्याचे मनगटी कडे व बांगड्या तारण ठेवून त्यावर कर्जाची उचल केली होती. २४ डिसेंबर २०१२ ते २१ डिसेंबर २०१३ या कालावधीत लोकांना जर्सी गाई मंजूर झाल्या, असे सांगून बँकेत नेत सोने तारणच्या कागदपत्रावर स्वाक्षऱ्या घेतल्या. परस्पर बँकेतून रकमेची उचल केली होती. मुदत संपूनही सोने सोडविले नाही म्हणून बँकेने ३० जुलैला सोन्याचा लिलाव ठेवला होता. यावेळी तपासणीत सोने बनावट असल्याचे उघड झाले व बँकींग क्षेत्रात एकच खळबळ उडाली. ‘लोकमत’ने सदर प्रकरण रेटून धरल्यानंतर शाखा प्रबंधक गणेश बाजीराव नईकर यांनी सोनारासह १७ लोकांच्या नावाची पोलिसात तक्रार दाखल केली होती.
तक्रारीवरून १७ लोकांविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४६८, ४७१, ४०८, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. पोलीस मुख्य आरोपी मंगेश साठे याचा शोध घेत होते. या कालावधीत पोलिसांनी विदर्भ, मराठवाडा, मध्यप्रदेशात त्याचा शोध घेतला; पण तो हुलकावणी देत होता. पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी ‘काहीही करा; पण आरोपीला शोधा’, असा निर्वाणीचा इशारा दिला होता. यामुळे ठाणेदार रामटेके यांनी अत्यंत गुप्त पाळत शोध सुरू केला होता. तो जालन्यात दडून बसल्याची गुप्त माहिती रामटेके यांना मिळाली. यावरून रात्रीतूनच जालना गाठत त्याला अटक करण्यात आली.
यामुळे बनावट सोने तारण प्रकरणाच्या तपासाला आता गती मिळणार आहे. बँकेच्या ज्या-ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्य आरोपीला मदत केली, त्या सर्वांची चौकशीची शक्यता आहे.


आजपर्यंत केलेली कारवाई
या प्र्रकरणात आतापर्यंत १८ लोकांवर गुन्हे दाखल झालेत. यात ठगसेन मंगेश रामकृष्ण साठे हा मुख्य आरोपी आहे. सोनार रामदास गोविंद खरवडे या आरोपीने नागपूर उच्च न्यायालयातून जामीन मिळविला. साठेला मदत केल्याप्रकरणी राजेश लक्ष्मण कालोकर यालाही अटक केली होती. त्याला न्यायालयाने जामीन दिला.


कोणत्या बाबी होणार स्पष्ट
ठगसेन साठेला बोलते केल्यास यात सहभागी कर्मचाऱ्यांची नावे पूढे येऊ शकतात. अन्य कुठे असे सोने तारण ठेवले काय, ही बाब स्पष्ट होईल. ५ किलो ८९३ ग्रॅम वजनाचे मनगटी कडे व बांगड्या कोणत्या सोनाराने बनविल्या, त्यावर मुलामा कुणी दिला, या बाबी स्पष्ट होणे गरजेचे आहे. दारिद्र रेषेखाली जीवन जगणाºया कवडू अवचित खोब्रागडेच्या नावावर ८ लाख ५० हजारांचे कर्ज उचलणारा आरोपी प्रशांत यादवराव नाईक याची भूमिका तपासणे गरजेचे आहे. नाईक दाम्पत्याच्या नावेही १७ लाख ८० हजारांचे बनावट सोने तारण आहे.

Web Title: Mangesh Sathe arrested in Bank of India fake gold case from Jalna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा