House fire; Loss of Savvadon Lakhs | घराला आग; सव्वादोन लाखांचे नुकसान
घराला आग; सव्वादोन लाखांचे नुकसान

ठळक मुद्देशॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : येथील देवेंद्र झाटे यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. यामुळे त्यांचे सुमारे सव्वा दोन लाखांचे नुकसान झाले आहे. सदर आगीत घरातील वस्तु, अन्न-धान्य, कपडे जळून खाक झाले.
अग्निशमन दलाची गाडी विलंबाने पोहचल्यामुळे व बघता-बघता आगीने घरातील साहित्य आपल्या कवेत घेतल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळविणेही कठीण झाले होते. परंतु, वेळीच परिसरातील नागरिकांनी आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. बाजारपेठ भागातील रहिवासी असलेल्या देवेंद्र झाटे यांच्या घराला लागलेल्या आगीने घरातील कुलर, टि.व्ही., फ्रीज, कपडे, धान्य आदी साहित्याला आपल्या कवेत घेतले होते. आग लागल्याचे लक्षात येताच नगरपंचायतच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. परंतु, नगरपंचायतीच्या अग्निशमन विभागाचे जबाबदार कर्मचारीच गायब होते. इतकेच नव्हे तर माहिती मिळाल्यावरही ते आपल्या सवडीनेच घटनास्थळी पोहोचल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. ज्या वेळी ही घटना घडली त्यावेळी झाटे यांच्या घरात घरगुती वापराचे गॅस सिलिंडर होते. परंतु, ते वेळीच सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्याने पुढील अनुचित प्रकार टळला. अचानक लागलेल्या आगीमुळे झाटे यांचे सुमारे सव्वादोन लाखांचे नुकसान झाले असून माहिती मिळताच तलाठी राजू घाडगे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.


Web Title: House fire; Loss of Savvadon Lakhs
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.