ज्योत प्रज्वलीत करून शहिदांना केले अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 11:57 PM2018-06-01T23:57:12+5:302018-06-01T23:57:12+5:30

येथील केंद्रीय दारूगोळा भडांरात ३१ मे २०१६ ला झालेल्या भयावर अग्निकांडास दोन वर्ष पूर्ण झाले आहे. त्या भयावह रात्रीचे पुन्हा स्मरण नको असे असले तरी या घटनेत आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या वीर माता-पितांसह पत्नींना मान्यवरांच्या हस्ते ३१ रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

 Greetings to martyrs by burning flame | ज्योत प्रज्वलीत करून शहिदांना केले अभिवादन

ज्योत प्रज्वलीत करून शहिदांना केले अभिवादन

Next
ठळक मुद्देकेंद्रीय दारूगोळा भंडारातील अग्निस्फोट : वीर माता-पित्यांसह पत्नींचा केला सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : येथील केंद्रीय दारूगोळा भडांरात ३१ मे २०१६ ला झालेल्या भयावर अग्निकांडास दोन वर्ष पूर्ण झाले आहे. त्या भयावह रात्रीचे पुन्हा स्मरण नको असे असले तरी या घटनेत आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या वीर माता-पितांसह पत्नींना मान्यवरांच्या हस्ते ३१ रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी ज्योत प्रज्वलीत करून सर्व शहिदांना आदरांजली अर्पण केली.
पुलगावच्या दारूगोळा भंडारातील १९ अधिकारी, सैनिक व अग्निशमन दलाच्या जवानांनी इतरांचे प्राण वाचविण्यासाठी ‘त्या’ काळरात्री आपल्या जीवाची पर्वा केली नाही. त्यांनी आपल्या प्राणाची आहूती देत लाखो नागरिकांचे प्राण वाचविले. त्यांच्या या बलिदानाला विसरता येत नाही. त्यांच्या कर्तव्याला मानाचा मुजरा करण्यासाठी गुरूवारी सायंकाळी शहरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वीर अमर जवान ज्योती पुढे पुष्पचक्र अर्पण करुन मान्यवरांसह अनेक नागरिकांनी सन्मानपूर्वक मानवंदना अर्पण केली. याच कार्यक्रमात अग्निस्फोटातील १३ शहिदांच्या कुटुंबीयांना राष्ट्रपती पदक देवून तर विदर्भातील ९ शहीद परिवारातील वीर पत्नी, माता व पित्यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह तसेच सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. शहीद दिन समारोह समितीच्यावतीने स्थानिक आर. के. हायस्कूलच्या शहीद स्मृती मंचावर खा. रामदास तडस, राज्यमंत्री मदन येरावार, सर्जीकल स्टाफचे प्रमुख माजी लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, केंद्रीय दारूगोळा भांडाराचे कमांडर ब्रियडिअर आयवर गोल्डस्थिम, आ. रणजीत कांबळे, आ. अमर काळे, माजी खासदार अनंत गुटे, समितीचे अध्यक्ष अभ्युदय मेघे, नगराध्यक्ष शितल गाते, मोहन अग्रवाल आदींची उपस्थिती होती.
यावेळी ‘एक शाम शहीदो के नाम’ या देशभक्तीपर गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी समितीच्यावतीने तयार केलेल्या मंचावर वीर अमर ज्योत प्रज्वलीत करण्यात आली. या अमर ज्योतीला सर्व मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करुन वीर शहीदांना अभिवादन केले. याप्रसंगी मान्यवरांसह उपस्थितांनी दोन मिनीट मैन पाळून वीरांना श्रद्धांजली अर्पण केली.
मनोगत व्यक्त करताना समितीचे अध्यक्ष अभ्युदय मेघे यांनी गत दोन वर्षांपासून शहीद कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी समितीच्यावतीने केलेल्या कार्याची माहिती दिली. शहीदांच्या स्मृतीत वाचनालय व वसतीगृह उभारण्याचा मानसही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
लेफ्ंटनंट जनरल राजेंद्र निंभोरकर म्हणाले की, पुलगावचा केंद्रीय दारूगोळा भांडार म्हणजे आशिया खंडातील सर्वात मोठा डेपो. त्या काळरात्री जर कदाचित १९ जवानांनी आपले बलिदान देत आगीवर नियंत्रण मिळविले नसते तर नागपूर ते अमरावती पर्यंतचा भाग नस्तनाभूत झाला असता. इतका शक्तीशाली साठा या भांडारात होता. ही बाबत येथील वीर जवानांना होती. परंतु, त्यांनी ती कुणालाही न सांगता आपल्या प्राणाची पर्वा न करता परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नामुळेच आज त्या घटनेतून लांखो बचावले असे म्हल्यास वावगे ठरू नये. ज्या देशाजवळ एवढा प्रचंड दारूगोळा आहे. त्या देशाचा संरक्षण विभाग किती शशक्त असेल याचा विचार इतर देशांना करण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते अग्निस्फोटातील बाळू पाखरे, अमित दांडेकर, अमोल येसनकर, कृष्ण कुमार, लिलाधर चोपडे, अमित पुनिया, बी.पी. मेश्राम, प्रमोद मेश्राम, नवज्योत सिंंह, एस.जी बालस्कर, धर्मेद्र यादव, अरविंद सिंग व कुलदिप सिंह शहीदांना मरणोपरांत राष्ट्रपती पदक देवून गौरविण्यात आले. सदर पदक शहीदांच्या कुटुंबियांनी स्विकारले. तर विदर्भातील अमरावतीचे शिपाई पंजाब उईके, यवतमाळचे शिपाई विकास कुळमेथे अकोलाचे शिपाई आनंद गवई व शिपाई संजू खंडारे, वर्धाचे पे्रमदास मेंढे, भंडाराचे शिपाई मंगेश बालपांडे व मेजर प्रफुल्ल मोहरकर, चंद्रपूरचे शिपाई नंदकुमार आत्राम व अकोलाचे शिपाई समेध गवई या शहीदांच्या वीर पत्नी, माता, पिता यांना सन्मान पत्र व स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी लेफ्ट. जनरल निंभोरकर, विवेक ठाकरे, श्याम परसोडकर, पुंडलिक नकवी चवडे यांचाही सत्कार करण्यात आला. ्रसंचालन नासिर यांनी केले. कार्यक्रमाला जि.प. सदस्य प्रवीण सावरकर, पं. स. सभापती किशोर गव्हाळकर, पं. स. सदस्य दिलीप अग्रवाल, संजय गाते, प्रशांत इंगळे तिगावकर, गुड्डू कावळे, नितीन बडगे, गजानन निकम यांच्यासह शहीद परिवारांमधील सदस्य व शहरातील गणमान्य व्यक्तींची उपस्थिती होती.

उल्लेखनिय कार्य करणाºयांना केले सन्मानित
राज्यातील कुठल्याही युवकाला देशाचे संरक्षण करताना वीर मरण आल्यास त्याच्या कुटुंबियांची भेट घेवून त्या शहीद परिवाराला २५ हजारांची आर्थिक मदत करणाऱ्या श्रीकांत राठी व गोविंद राठी यांना कार्यक्रमादरम्यान गौरविण्यात आले. त्यांनी मुरलीधर हवालदार, अनंतराम राय, मुसाका, लिला थोरात या चार शहीदांच्या कुटुंबियांना मदत केली आहे. तर यावेळी अतुल पडधारिया व सुभाष झांझरी यांचाही मान्यवरांनी गौरविले.

सैनिकांच्या कार्याची जाण ठेवली पाहिजे- येरावार
आपले जवान देशाचे सिमेवर रात्रंदिवस संरक्षणासाठी तत्पर आहेत. म्हणूनच आज आपण येथे निवांतपणे बसून आहोत. त्यांचे कार्य मोठे आहे. पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडारात झालेल्या अग्निस्फोटामध्ये शहीद झाल्याचे दु:ख काय असते हे त्यांच्या कुटुंबियांनाच कळते. परंतु, त्याच्या दु:खावर पांघरुन घालण्याच, त्यांच्या समस्या सोडविण्याच काम शहीद समारोह समिती करीत आहे ही खरच कौतुकास्पद बाब आहे. एकेकाळी पुलगावचा गणेशोत्सव प्रसिद्धीस होता. आज तेच शहर शस्त्रस शक्तीचा आठवण देणारे ठरावे ही मोठी बाब आहे. देशातील प्रत्येक सैनिकांमुळेच आपण सुरक्षीत आहोत. त्यामुळे प्रत्येकाने सैनिकांच्या कार्याची जाण ठेवली पाहिजे, असे यावेळी ना. मदन येरावार यांनी सांगितले.

सैनिकांच्या कार्याला सलामच - रामदास तडस
३१ मे २०१६ ची काळरात्र आठवली की आजही आपल्याला भीती वाटते. एकीकडे घरात मोठ्या भावाचे पडलेले प्रेत तर दुसरीकडे काळ्याकुट्ट अंधारात नागरिकांवर आलेले मोठे संकट व त्या संकटाला घाबरलेले ग्रामस्थ अशीच परिस्थिती माझ्या समोर होती. यावेळी आपण स्वत:चे दु:ख बाजूला सारुन दहशतीत असलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचलो. मिळेल त्या वाहनाने भांडारा लगतच्या ग्रामस्थाना देवळी, नाचणगाव येथे हलविले. तसेच त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. हे सांगायचे कारण म्हणजे आपण आपले सामाजिक दायित्व पूर्ण केले. शिवाय आपण लोकसभेत वेळोवेळी अग्निस्फोटात मृत्यू झालेल्यांना शहिदांचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले. सैनिकांचे कार्य मोठे असून त्याला सलामच आहे, असे खा. तडस म्हणाले.

घटनेत जखमी झालेल्या जवानांच्या कार्याचा गौरव
केंद्रीय दारुगोळा भंडारातील अग्निस्फोटात काही जवान जखमी झाले होते. यात किशोर साहू, सुरजित सिंग, प्रदिपकुमार, श्रीराम वानकर, संताप पाटील, राजेंद्र अहिजा, सतीश गव्हाणकर, दीपक शिंदे, चंदू पराते यांचा समावेश आहे. यावेळी त्यांना त्यांच्या कार्याबद्दल गौरविण्यात आले.

देशभक्तीपर गीतांनी भारावले उपस्थित
सदर कार्यक्रमादरम्यान ‘एक श्याम शहीदो के नाम’ हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमादरम्यान एकापेक्षा एक देशभक्तीपर गीत गायकांनी सादर केले. सदर गीतांना उपस्थितांनीही टाळ्यांची साथ दिली. या देशभक्तीपर गितांनी उपस्थित भारावले होते. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title:  Greetings to martyrs by burning flame

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.