पालिकेची अतिक्रमण हटाओ मोहीम : छोट्या व्यावसायिकांची प्रतिष्ठाने हटविली
वर्धा : शहरातील वाढलेल्या अतिक्रमणामुळे अनेक रस्ते अरूंद होत आहे. रस्ते मोकळे करण्यासाठी वर्धा नगर पालिकेच्यावतीने अतिक्रमण हटाओ मोहीम हाती घेण्यात आली आहे. यार बुधवारी पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात स्थानिक महात्मा गांधी पुतळा चौक ते इंदिरा गांधी पुतळा चौक दरम्यानचे अतिक्रमण काढले. सदर मोहिमेदरम्यान पालिका कर्मचाऱ्यांनी अनेक छोट्या व्यावसायिकांची दुकाने हटविली.
शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी वाढलेले अतिक्रमण हटविणे आणि अरुंद रस्ते मोकळे करण्याकरिता रस्त्याच्या कडेला थाटलेल्या दुकानांना हटविण्यात आले. सदर मोहीम तीन दिवस प्रभावीपणे राबविली जाणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली. दरम्यान महात्मा गांधी पुतळा ते इंदिरा गांधी पुतळा चौक तसेच महात्मा गांधी पुतळा चौक ते बजाज चौक या मार्गावरील अतिक्रमण काढण्यात येणार आहे. बुधवारी सकाळपासूनच पालिका कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण हटविण्याचे कार्य सुरू केले. या मोहीमेदरम्यान पालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांनी पोकलँडच्या सहाय्याने सिव्हील लाईन परिसरातील प्रशासकीय इमारती समोरील अनेक छोट्या व्यावसायिकांची दुकाने हटविली. या मोहिमेत वर्धा नगर परिषदेचे अभियंता सुधीर फरसोले, कर्मचारी अशोक ठाकूर, निखील लोहवे, लिलाधर निखाडे, प्रवीण बोबडे, दिलीप बुथे, राहुल भगत, खुशाल गोळघाटे, विशाल सोमवंशी, चेतन खंडाते, दिलीप तराळे, प्रमोद तामगाडगे, राजेंद्र शंभरकर आदी सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी)

शहरातील रस्ते घेणार मोकळा श्वास
शहरातील रस्त्यांवर वाढते अतिक्रमण पाहता रस्त्यांचा आकार कमी होत आहे. वाहनांची संख्या वाढतच असून काही वर्दळीच्या मार्गावर वाढलेल्या अतिक्रमणामुळे रस्ता अरूंद झाला आहे. या रस्त्याने वाहन चालविणे कठीण झाले आहे. हे अतिक्रमण हटविण्याची मगाणी वाहन चालकांतून करण्यात आली. पालिकेने हाती घेतलेल्या या मोहिमेतून शहरातील रस्ते मोकळे करण्यात येत आहे. यातून वाहतुकीची होणारी कोंडी कमी करण्याचा प्रयत्न असणार आहे. यात अनेक छोट्या व्यावसायिकांच्या प्रतिष्ठानांवर गदा येणार असल्याचे दिसते.