मुख्य जलवाहिनीला निधीचा अटकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 11:47 PM2018-05-27T23:47:12+5:302018-05-27T23:47:12+5:30

पवनार व येळाकेळी येथील धाम नदीवरून वर्धा शहराला पाणी पुरवठा केला जातो; पण पवनार ते वर्धा ही नऊ किमीची जलवाहिनी जीर्ण झाली आहे. नवीन जलवाहिनी टाकणे गरजेचे असताना न.प. प्रशासन जुन्याच जलवाहिनीच्या आधारावर आपले काम काढून घेत आहे.

Funding of the main water channel | मुख्य जलवाहिनीला निधीचा अटकाव

मुख्य जलवाहिनीला निधीचा अटकाव

googlenewsNext
ठळक मुद्देतीन किमीपर्यंतचे काम युद्धपातळीवर : नगर परिषदेला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचा आधार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पवनार व येळाकेळी येथील धाम नदीवरून वर्धा शहराला पाणी पुरवठा केला जातो; पण पवनार ते वर्धा ही नऊ किमीची जलवाहिनी जीर्ण झाली आहे. नवीन जलवाहिनी टाकणे गरजेचे असताना न.प. प्रशासन जुन्याच जलवाहिनीच्या आधारावर आपले काम काढून घेत आहे. या नव्या मुख्य जलवाहिनीच्या कामात न.प. प्रशासनाकडे नसलेल्या निधीचा अटकाव होत आहे. सदर ९ किमी जलवाहिनीपैकी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ३ किमीची जलवाहिनी न.प. प्रशासनाना टाकून देत आहे. हे काम युद्धपातळीवर सुरू असून हवालदिल नगर पालिका प्रशासनाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणची ही मदत आधार देणारीच ठरत आहे.
पवनार येथील धाम नदीच्या पात्रातून वर्धेपर्यंत पाणी आणण्यासाठी तब्बल ९ किमीची मुख्य जलवाहिनी सुमारे पाच दशकांपूर्वी टाकण्यात आली होती; पण सध्या ही जलवाहिनी जीर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. मागील आठवड्यात ही जलवाहिनी वर्धा-नागपूर महामार्गावरील दत्तपूर शिवारातील दर्गाह परिसरात फुटल्याने वर्धा शहरात कृत्रिम जलसंकट निर्माण झाले आहे. सध्या वर्धा शहराला येळाकेळी येथून पाणी घेऊन पाणी पुरवठा केला जात आहे. जुनी जलवाहिनी जीर्ण झाल्याने वर्धा ते पवनार ही ९ किमीची जलवाहिनी टाकण्यासाठी प्रारंभी न.प. प्रशासनाच्यावतीने कार्यालयीन स्तरावर प्रयत्न करण्यात आले; पण नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी लागणारा मोठा निधी कुठून उभा करावा, असा प्रश्न निर्माण झाल्याने न.प. प्रशासन स्वस्थ बसले. त्यानंतर याच जलवाहिनी शेजारून महामार्गाचे काम होणार असल्याने न.प. प्रशासनातील लोकप्रतिनिधींनी ना. नितीन गडकरी यांच्याकडे या जलवाहिनीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने करून द्यावे, अशी मागणी केली. त्यावर सकारात्मक विचार होऊन नऊ किमीपैकी ३ किमीची जलवाहिनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करून देण्यास तयार झाले आहे. सध्या सुमारे दोन किमीची नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित एक किमीच्या जलवाहिनीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे; पण उर्वरित सहा किमीची नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी वर्धा नगर पालिकेकडे पैसाच नसल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे उर्वरित जलवाहिनीपैकी सुमारे दीड ते दोन किमीची जलवाहिनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने टाकून द्यावी, अशी विनंती न.प.तील लोकप्रतिनिधी पुन्हा एकदा ना. नितीन गडकरी यांच्याकडे करणार असल्याची चर्चा न.प. कार्यालयात सुरू आहे.
दुरूस्तीनंतर अज्ञाताने फोडली जलवाहिनी
पवनार-वर्धा ही मुख्य जलवाहिनी फुटल्याने न.प. प्रशासनाच्या अडचणीत भर पडली. युद्धपातळीवर दुरूस्तीचे काम शनिवारी पूर्ण करण्यात आले होते; पण शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यावर हीच जलवाहिनी पुन्हा घणाने फोडली. हा प्रकार रविवारी सकाळी न.प. प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला. सोमवारी या प्रकरणी वरिष्ठांशी चर्चा करून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
जून महिन्यात पूर्ण होणार पाईपलाईनचे काम
वर्धा ते पवनार या नऊ किमीपैकी तीन किमीची जलवाहिनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या माध्यमातून टाकून दिली जात आहे. दोन किमी जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले असून एक किमी जलवाहिनी युद्धपातळीवर टाकली जात आहे. हे काम जून महिन्यात पूर्ण होऊन सदर जलवाहिनी वर्धा न.प. प्रशासनाला हस्तांतरीत करण्यात येणार आहे.
२३ तास सुरू ठेवावे लागतात येळाकेळीचे पंप
पवनार येथून धाम नदी पात्रातून पाण्याची उचल करून ते वर्धा शहराला पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी दत्तपूर शिवारातील दर्गाह जवळ फुटल्याने वर्धा शहरात कृत्रिम जलसंकट निर्माण झाले आहे. वर्धा शहरातील नागरिकांची समस्या लक्षात घेता एरवी १६ तास सुरू ठेवण्यात येणारे येळाकेळी येथील पंप आता सुमारे २३ तास सुरू ठेवले जात आहेत. एकूणच वर्धा-पवनार ही मुख्य जलवाहिनी फुटल्याने त्याचे लोड येळाकेळी येथील पंपांवर आले आहे.
दररोज होते ३४ दलघमी पाण्याची उचल
वर्धा वासियांना पाणी पुरवठा करण्यासाठी वर्धा न.प. प्रशासन येळाकेळी व पवनार येथील धाम नदीच्या पात्रातून पाण्याची उचल करते. दररोज सुमारे ३४ दलघमी पाण्याची उचल पवनार येथून केली जात असल्याचे सांगण्यात आले. जीर्ण जलवाहिनीत कुठलाही तांत्रिक बिघाड झाल्यास याचा फटका वर्धेकरांना सहन करावा लागतो, हे वास्तव आहे.

पवनार-वर्धा ही मुख्य जलवाहिनी फुटल्याने येळाकेळी येथून २३ तास पंप सुरू ठेवून पाण्याची उचल केली जात आहे. वर्धा-पवनार या नऊ किमीपैकी ३ किमीची जलवाहिनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करून देत आहे. जून महिन्यात हे काम पूर्ण करून जलवाहिनी नगर परिषदेला हस्तांतरीत करण्यात येणार आहे.
- निलेश नंदनवार, अभियंता, पाणी पुरवठा विभाग, नगर परिषद, वर्धा.

Web Title: Funding of the main water channel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.