ठळक मुद्देखासदार, आमदार उपस्थित : बहुप्रतीक्षित पुलाकरिता २५ कोटी मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदी(रेल्वे) : नागपूर-मुंबई या रेल्वे लाईनमुळे सिंदी (रेल्वे) वासीयांची अनेक कामे खोळंबत होती. रेल्वे फाटकावर त्यांना तासणतास थांबावे लागत होते. या त्रासापासून त्यांची सुटका होणार असून या पुलाकरिता २५ कोटी रुपये मंजूर झाले. शिवाय पुलाच्या कामाची पायाभरणी आ. समीर कुणावार यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी खा. रामदास तडस यांची उपस्थिती होती.
सिंदी (रेल्वे) शहराला स्वप्ननगरी बनविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहो. शहराच्या सर्वांगीण विकासावर लक्ष ठेवणार अशी घोषणा आ. कुणावार यांनी कार्य्रकामादरम्यान केली. यावेळी बोलताना खा. तडस म्हणाले की, या उड्डाणपुलाच्या कामाला मंजुरी मिळवी म्हणून पाच वेळा हा प्रश्न लोकसभेत लावून धरला. वर्धा जिल्ह्यात केवळ दोन शहरात रेल्वे उड्डाण पुलाचे काम होणार आहे. उर्वरित भागाच्या विकासासाठी ६ हजार कोटीचे काम प्रस्तावित आहे आणि त्यानंतर येत्या दीड वर्षात जिल्ह्याचा चेहरा- मोहरा बदलेल. भारतीय जनता पक्षाने आधी वर्क आॅर्डर घ्यावा आणि नंतर विकास कामाचे भूमिपूजन करावे अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवून ठेवल्या आहेत. वर्धा लोकसभा मतदार संघाचा विकासाचा बॅकलॉग फार मोठा होता तो आता ५० टक्के कमी होणार असल्याचेही ते म्हणाले. येथे होणाºया ड्रायपोर्टला जोडणारा हाय-वे निर्माण करण्यात येणार आहे. १९८५ पासून रखडलेल्या लोवर वर्धा प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सिंदीकरांसाठी अत्यावश्यक असणाºया महाराष्ट्र एक्सप्रेसचा थांबा १ महिन्यात मंजूर करून घेणार, अशी घोषणा त्यांनी याप्रसंगी केली. स्थानिक नगर परिषदतर्फे या कार्यक्रमाच्या प्रारंभी २५ कोटी रुपयांचा उड्डाणपुलाच्या पायाभरणीचे तसेच सेलडोह-कांढळी मार्गाचे विस्तारीकरणाचे काम आ. समीर कुणावार यांच्या हस्ते व खा. रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी नगराध्यक्ष संगीता शेंडे, उपाध्यक्ष वंदना डकरे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका तसेच विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी, भाजपाचे शहराध्यक्ष सुधाकर घवघवे, भाजपाचे महामंत्री किशोर दिघे, महाराष्ट्र तैलिक महासंघाचे महासचिव प्रा. भूषण कर्डीले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शरद चौधरी, जि.प. सदस्य विनोद लाखे, पं.स. सदस्य नरेश तलवारे, समुद्रपूर पं.स.चे उपसभापती योगेश फुसे, उड्डाणपुलाशी संबंधित विविध विभागाचे अभियंतागण, मध्य रेल्वे नागपूर विभागाचे अभियंता डहाणे, मोटघरे यांच्यासह विविध अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. कंत्राटदार कृष्णा मंदाली यांना उद्देशून दोन्ही लोकप्रतिनिधींनी विहीत मुदतीत उड्डाणपूलाचे काम पूर्ण केल्यास बोनस देण्याची घोषणा केली.
कार्यक्रमाचे संचालन ओमप्रकाश राठी यांनी केले तर उपस्थितांचे आभार गंगाप्रसाद शुक्ला यांनी मानले. कार्यक्रमाला सिंदी शहर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.