जिल्हाधिकारी कार्यालयातच विजेची उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 09:36 PM2019-04-12T21:36:59+5:302019-04-12T21:37:50+5:30

लोकसभा निवडणूक अर्थात लोकशाहीचा सण गुरुवारी पार पडला. यादरम्यान अधिकारी-कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याने दुसऱ्या दिवशी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कमालीचा शुकशुकाट पाहायला मिळाला.

Electricity extraction in Collector's office | जिल्हाधिकारी कार्यालयातच विजेची उधळपट्टी

जिल्हाधिकारी कार्यालयातच विजेची उधळपट्टी

Next
ठळक मुद्देपंखे, दिवे सुरूच; अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामात

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लोकसभा निवडणूक अर्थात लोकशाहीचा सण गुरुवारी पार पडला. यादरम्यान अधिकारी-कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याने दुसऱ्या दिवशी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कमालीचा शुकशुकाट पाहायला मिळाला. मात्र, विद्युत दिवे सुरूच होते, तर पंखे रित्या खुर्च्यांना हवा देत असल्याचे चित्र कार्यालयीन वेळ असलेल्या दुपारी १२ वाजताच्या सुमारास पाहायला मिळाले.
वर्धा लोकसभेकरिता गुरुवारी जिल्ह्यात मतदान घेण्यात आले. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच संपूर्ण जिल्हा प्रशासन निवडणूक कामात होते. निवडणूक प्रक्रियेला अंतिम स्वरूप देईपर्यंत सर्वच नाही, मात्र बहुतांश कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामकाज करावे लागले. निवडणुकीच्या एक आठवड्यापासूनच निवडणूक विभागासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चक्क पहाटेपर्यंत काम करावे लागले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांपासून कर्मचारी, शिपायापर्यंत निवडणुकीकरिता ड्युटी लागली होती. त्यामुळे निवडणुकीच्या कालावधीत सर्वच विभागातील कर्मचारी फायलींच्या ढिगांनी वेढलेले दिसून आले. विविध विभागांतील कर्मचारी मतदानाच्या एक दिवस अगोदर, बुधवारी सकाळी नियोजित मतदान केंद्रांवर रवाना झाले. मतदान केंद्रांवर ड्युटी लागलेल्या कर्मचाऱ्यांना सकाळी ७ ते सायंकाळी ६ असे ११ तास डोळ्यात तेल घालून मतदान प्रक्रिया पार पाडावी लागली. ही प्रक्रिया आटोपल्यानंतर रात्री उशिरा कर्मचारी निवडणूक साहित्य घेऊन जिल्हास्थळी पोहोचले.
शुक्रवारी लोकमत चमूने जिल्हाधिकारी कार्यालयासह शहरातील इतर कार्यालयाचा फेरफटका मारला असता जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक विभागांत प्रचंड शुकशुकाट होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील जमीन विभागात दुपारी १२.३० वाजले तरी कुणी अधिकारी, कर्मचारी आले नव्हते. मात्र, जमीन शाखेतील पंखे आणि दिवे सुरूच होते.
खुर्च्यांना अधिकाऱ्यांची प्रतीक्षा होती, असे परिस्थितीवरून दिसून आले. विजेची अशी उधळपट्टी होत असताना कुणाचेही याकडे लक्ष नव्हते. तालुकास्तरावरून आलेल्या कित्येक नागरिकांना कामाविनाच आल्यापावली परतावे लागले. याविषयी विचारणा केली असता ‘निवडणूक काम झाल्याने आले नसतील’, असे उत्तर मिळाले.

विभागप्रमुखही गायब!
जिल्हा प्रशासनाने निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी कुठलीही सुटी घोषित केली नसताना शहरातील इतर शासकीय कार्यालयांतील विभागातही अनेक कक्ष निर्मनुष्य होते. अधिकारी कर्मचारी रितसर सुटीवर आहे की नाही, याविषयी संबंधित विभागप्रमुखही अनुपस्थित असल्याने कळू शकले नाही.

Web Title: Electricity extraction in Collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.