Eclipse of unclear instructions for purchase of Nafed gram | नाफेडच्या चणा खरेदीला अस्पष्ट सूचनांचे ग्रहण
नाफेडच्या चणा खरेदीला अस्पष्ट सूचनांचे ग्रहण

ठळक मुद्देआदेश धडकले यंत्रणा पडली बुचकाळ्यात

रूपेश खैरी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : तूर खरेदीनंतर नाफेडच्यावतीने आता चण्याची खरेदी सुरू होत आहे. या खरेदीतही प्रारंभी नेहमीप्रमाणे अडचणीच येत असल्याचे दिसत आहे. एका शेतकऱ्यांकडून एकराच्या हिशेबाने किती खरेदी करावी याचा उल्लेख आदेशात नाही. परिणामी, खरेदी प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी असलेली यंत्रणा बुचकळ्यात पडली आहे. यामुळे खरेदीचा मुहूर्त केव्हा आणि कसा साधावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ज्या केंद्रांवरून तूर खरेदी सुरू आहे, त्याच केंद्रांवरून चण्याची खरेदी होणार आहे. या केंद्रांवर तूर आणणाऱ्या शेतकऱ्यांची गर्दी आहे. तूर उत्पादकांच्या गर्दीत पुन्हा चण्याची खरेदी कशी करावी, असा प्रश्न केंद ्रचालकांसमोर आहे. अशा परिस्थितीत खरेदी करताना या यंत्रणेचा चांगलाच कस लागणार असल्याचे दिसते. केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची कमतरता आणि साहित्याचा अभाव यामुळे तूर खरेदीला गती नाही. यात आता चण्याची खरेदी सुरू करावी लागत असल्याने काम कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांच्या शेतातील चणा निघणे सुरू झाले आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात येताच दर पडणे सुरू आहे. व्यापाऱ्यांकडून चण्याला सध्या ३२०० ते ३५०० रुपयांच्या आसपास दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना किमान हमीभावाचे ४४०० रुपये मिळावे, अशी अपेक्षा आहे. या अपेक्षेमुळे शेतकऱ्यांची नाफेडच्या केंद्रावर गर्दी होणे स्वाभाविक आहे; पण मर्यादेची समस्या निर्माण झाल्याने अडचणी आहेत. यावर शासनाने त्वरित मार्ग काढून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी आहे.

चण्याच्या खरेदीतही रंगाची अट
तूर खरेदीत पोतं शिवण्याकरिता काही ठराविक रंगाच्या सूतांचा वापर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या रंगानुसार चण्याचीही खरेदी व्हावी, अशा सूचना आहे. मात्र आदेशित केलेल्या रंगाचे सूत मिळत नसल्याने जमेल त्या रंगाच्या सूताने पोते शिवण्याचे काम सुरू असल्याचे चित्र राज्यात आहे.

तुरीच्या नियमानुसार होणार खरेदी
यंदाच्या हंगामात शासनाने सोयाबीन, तूर आॅनलाईन नोंदी करून खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसारच चण्याचीही खरेदी होणार आहे. यामुळे शेतकºयांना पहिले चण्याकरिता आॅनलाईन नोंदी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. चणा विक्रीकरिता आॅनलाईन पद्धत अंमलात येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांना नसल्याने त्यांची तारांबळ उडत आहे.
वर्धा जिल्ह्यात तूर खरेदी होत असलेल्या सात केंद्रांवरून चण्याची खरेदी करण्याची तयारी सुरू झाली आहे. मात्र मर्यादेच्या अडचणीमुळे शेतकऱ्यांना सध्या थांबा असे सांगण्यात येत आहे.


चणा खरेदी करण्यासंदर्भात सूचना आल्या आहेत. या सूचना करताना एकरी मर्यादा सांगण्यात आल्या नाही. या संदर्भात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही हात वर केले आहे. यामुळे खरेदीचा मुहूर्त कसा साधाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- व्ही.पी. आपदेव, जिल्हा मार्केटींग अधिकारी, वर्धा.


Web Title: Eclipse of unclear instructions for purchase of Nafed gram
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.