Eclipse of Grader from Wardha's purchase of Nafed Ture | वर्ध्याच्या नाफेड तूर खरेदीला ग्रेडरचे ग्रहण

ठळक मुद्देराज्यात १६० केंद्र सुरूआतापर्यंत केवळ ३,७५५ क्विंटलची आवक

रूपेश खैरी।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शासनाची तूर खरेदी सुरू झाली. बाजारात भाव नसल्याने शेतकऱ्यांची या केंद्रावर तूर येणे सुरू आहे. मात्र या केंद्रावर नाफेडचे ग्रेडरच नसल्याने खरेदी अडचणीत आहे. शिवाय झालेली खरेदी ग्रेडरमार्फत नसल्याने ती रद्द होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
नाफेडने तूर खरेदी सुरू केल्यानंतर त्यांच्या केंद्रावर त्यांचेच ग्रेडर असणे अनिवार्य होते. मात्र त्यांच्या ग्रेडरची नियुक्ती वखार महामंडळाच्या गोदामावर करण्यात आली आहे. त्यांच्याकडून येथे तुरीचे ग्रेडींग करण्यात येणार असल्याचे पणन महासंघाचे अधिकारी सांगत आहेत. केंद्रावर मार्केटींग फेडरेशनचे ग्रेडर काम सांभाळतील असे या अधिकाºयांकडून सांगण्यात येत आहे. मात्र मार्केटींग फेडरेशनकडे केंद्राच्या तुलनेत मनुष्यबळ नसल्याने त्यांच्याकडून ग्रेडींग शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांची तूर खरेदी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
केंद्रावर तुरीचे गे्रेडींग झाल्यास शेतकऱ्यांना ते सोयीचे होईल. येथून खरेदी झालेली तूर गोदामात गेल्यावर ती नाकारण्याचा प्रकार झाल्यास त्याचा अतिरिक्त भुर्दंड शेतकऱ्यांना बसणार आहे. सध्या केंद्रावर ग्रेडरच्या अनुपस्थितीत तूर खरेदी आहे. येथे ग्रेडर आल्यानंतर खरेदी पत्रावर त्याची स्वाक्षरी घेवून गोदामात पाठविण्यात येणार आहे. राज्यात १६० केंद्रांवरून तूर खरेदी सुरू आहे. या केंद्रांवर आतापर्यंत ३ हजार ७५५ क्विंटलची आवक झाली आहे. मात्र झालेली खरेदी ग्रेडरच्या अनुपस्थितीत झाल्याने ग्रेडर येताच ती रद्द होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नाफेडच्या मदतीला विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटींग
नाफेडच्या केंद्रावर शेतकऱ्यांच्या गर्दीची शक्यता असल्याने त्यांच्या मदतीला विदर्भ को-आॅपरेटीव्ह मार्केटींग तूर खरेदी करणार आहे. त्यांचे केंद्र राज्यात काही ठराविक ठिकाणी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
वर्धेत आवक नाही
वर्धा जिल्ह्यात नाफेडच्यावतीने एकूण सात केंद्र देण्यात आले आहे. पैकी पाच केंद्र सुरू झाली तर दोन केंद्रांना अद्याप मुहूर्त मिळाला नाही. पाच पैकी एकाही केंद्रावर ग्रेडर नसल्याने येथे अद्याप खरेदी झाली नाही. तर वर्धेच्या केंद्रावर गे्रडरच्या अनुपस्थितीत तूर खरेदी सुरू आहे.


नाफेडने खरेदी केंद्र सुरू केल्यानंतर त्यांचे ग्रेडर केंद्रावर देणे अनिवार्य होते. पण असे न होता ग्रेडरची जबाबदारी मार्केटिंग फेडरेशनला दिली. नाफेडचे ग्रेडर वखार महामंडळाच्या गोदामात येणाऱ्या तुरीची ग्रेडींग करणार आहेत.
- कल्याण कानडे, सर व्यवस्थापक, पणन महासंघ, मुंबई.

मार्केटिंग फेडरेशनतर्फे प्रत्येक केंद्रावर ग्रेडर नियुक्त करणे शक्य नाही. तेवढे मनुष्यबळ फेडरेशनकडे नाही. यामुळे खरेदी सध्या रखडली आहे.
- व्ही.पी. आपदेव, जिल्हा मार्केटींग अधिकारी, वर्धा


राज्यात १.४६ लाख शेतकऱ्यांची नोंदणी
तूर संकलन केंद्रावर एकूण १ लाख ४६ हजार शेतकऱ्यांची नोंद झाली आहे. त्यांना संदेश पाठविणे सुरू झाले आहे. मात्र शेतकऱ्यांकडून दरवाढीच्या प्रतीक्षेत तूर घरीच ठेवल्या जात असल्याचे दिसत आहे.