भंगार बसगाड्यांमुळे चालक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 09:58 PM2018-01-21T21:58:59+5:302018-01-21T21:59:11+5:30

लक्झरी बसेस सुरू करून राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहे. असे असले तरी भंगार बसेस मात्र रस्त्यावरून हटविल्या जात नसल्याचे पाहावयास मिळत आहे. परिणामी, अत्यल्प वेतनातील नोकरीही भंगार बसेसमुळे चालकांना नाईलाज म्हणून करावी लागत आहे.

Due to scratches bus drivers the driver suffers | भंगार बसगाड्यांमुळे चालक त्रस्त

भंगार बसगाड्यांमुळे चालक त्रस्त

Next
ठळक मुद्देसाधारण बसेसचा लांब पल्ल्यासाठी वापर : अत्यल्प वेतनातील नोकरीचाही नाईलाज

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लक्झरी बसेस सुरू करून राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहे. असे असले तरी भंगार बसेस मात्र रस्त्यावरून हटविल्या जात नसल्याचे पाहावयास मिळत आहे. परिणामी, अत्यल्प वेतनातील नोकरीही भंगार बसेसमुळे चालकांना नाईलाज म्हणून करावी लागत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या संपाचा परिवहन महामंडळ व मंत्र्यांवर परिणाम न झाल्याने चालक, वाहक व कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या मानसिकतेत आहेत.
राज्यातील शासकीय, निमशासकीय सेवांमध्ये सर्वात कमी वेतनाची नोकरी म्हणून राज्य परिवहन महामंडळाचे नाव समोर येत आहे. विशेषत: चालक आणि वाहक यांना तर अत्यल्प वेतनावर हेलपाटेच मारावे लागत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नको ती नोकरी, असे मत चालक, वाहकांचे आहे. असे असले तरी दुसरा पर्याय नसल्याने तथा शासकीय नियमानुसार अन्य सुविधा मिळत असल्याने कुटुंबाचा खर्च भागत नसताना कर्मचारी कार्यरत असल्याचे त्यांच्याच बोलण्यातून समोर येत आहे. राज्य परिवहन महामंडळाने शिवशाही या नवीन लक्झरी बसेस सुरू केल्या आहेत. असे असले तरी त्या बोटावर मोजण्याइतक्याच आहेत. या बसेससाठी महामंडळाने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला; पण भंगार बसेस रस्त्यावरून हटवून त्या जागी नवीन बसेस आणण्याकरिता कुठलेही प्रयत्न होत नाही.
वर्धा जिल्ह्यात पाच आगार आहेत. यातील सर्वच आगारांमध्ये भंगार बसेसचा भरणा करण्यात आलेला आहे. पुलगाव आगारामध्ये ४५ बसेस आहेत. यातील बहुतांश बसेस आऊट डेटेड झालेल्या आहेत. यामुळे त्या लांब पल्ल्यावर नेताना चालकांना विचार करावा लागतो. असे असले तरी अधिकारी मात्र कुठलीही बस नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर आदी ठिकाणी पाठवित असल्याची कुजबूज ऐकावयास मिळते. पुलगाव ते नागपूर प्रवासी घेऊन जाणाºया बसेस ४० ते ५० किमी प्रती तास या गतीच्या वर सरकत नाहीत. परिणामी, चालकांना बस चालवावी की नाही, असा प्रश्न पडतो. शिवाय बसमध्ये बसल्यानंतर प्रत्येक टप्पर वेगवेगळे लावल्यागत आवाज होतो. यामुळे प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो. रविवारी सकाळी १०.१५ वाजता पुलगाव येथून नागपूरकडे निघालेली बस ४० किमी प्रती तास या वेगाच्या वर धावत नव्हती. चालकाला महत् प्रयत्नांनी सदर बस वर्धा बसस्थानकापर्यंत आणावी लागली. बसची गती आणि आवाज पाहून नागपूरचे प्रवासी घ्यावे की नाही, असा प्रश्नही चालक व वाहकांना पडला होता. बस कुठे बंद तर पडणार नाही ना, अशी भीतीही त्यांना सतावत होती. यामुळे देवळी येथून प्रवाशांनीही दुसऱ्या बसने प्रवास करण्यालाच पसंती दिली.
ग्रामीण भागात साधारण बस म्हणून चालावी, अशी गाडी नागपूर, अमरावती येथे पाठविली जात असल्याचा सूर बसस्थानकावरील चालक, वाहकांमध्ये उमटत होता. असे असले तरी नोकरी आहे, करावीच लागेल म्हणून चालक बसगाड्या चालवित असल्याचे प्रकर्षाने जाणवले. काही वर्षांपूर्वी लागलेल्या चालकांना केवळ १२ हजार ५०० ते १५ हजार रुपये वेतनावर नोकरी करावी लागत असल्याची त्यांच्याकडून सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी केलेल्या आंदोलनात महामंडळाला तीन महिन्यांचे ‘अल्टीमेटम’ देण्यात आले होते; पण त्याचा उपयोग झालेला नाही. यामुळे आता बेमुदत संप करणार असल्याची स्पष्टोक्ती काही चालकांकडून देण्यात आली आहे. या प्रकारामुळे पुन्हा प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार टाळण्यासाठी परिवहन महामंडळाने चालक, वाहक व कर्मचाºयांचे वेतन तथा भंगार बसेसमध्ये सुधारणा करणेच गरजेचे झाले आहे.
‘दे धक्का’ बसेसमुळे अवैध प्रवासी वाहतूक जोमात
वर्धा, पुलगाव, हिंगणघाट, तळेगाव आणि आर्वी या पाचही आगारांमध्ये बहुतांश भंगार बसेसचा भरणा करण्यात आलेला आहे. परिणामी, येथील बसेला कधी, कुठे धक्का मारावा लागेल, हे सांगणेच कठीण झाले आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या यशवंती बसेस तर बेभरवशाच्याच झाल्या आहेत. मागील दहा दिवसांत धक्का माराव्या लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. वर्धा आगारातून माळेगाव (ठेका) जाणारी तथा पुलगाव आगाराच्या आर्वी मार्गावर चालणाऱ्या अनेक बसेस धक्कामार आहेत. यामुळे चालक व वाहकही त्रस्त आहेत. परिणामी, हे प्रवासी अवैध प्रवासी वाहतुकीकडे वळताना दिसतात.

Web Title: Due to scratches bus drivers the driver suffers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.