Drought-free 'Dham' will overcome future water congestion | गाळमुक्त ‘धाम’ करेल भविष्यातील जलसंकटावर मात
गाळमुक्त ‘धाम’ करेल भविष्यातील जलसंकटावर मात

ठळक मुद्देसाडेतीन दशकांत सर्वाधिक गाठला तळ : गाळाचा शेतकऱ्यांना होणार फायदा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत विविध तलावांची पाणी साठवण क्षमता वाढविण्यावर भर दिला जात आहे. परंतु, वर्धा शहरासह परिसरील १५ गावांची पाणी समस्या निकाली काढण्यासाठी फायद्याचा ठरणाऱ्या महाकाळी येथील धाम जलाशयाला गाळमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन कुठलेही पाऊल उचलताना दिसत नाही. विशेष म्हणजे मागील साडेतीन दशकाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी सर्वात जास्त तळ या प्रकल्पाने गाठला आहे. धाम प्रकल्प गाळमुक्त झाल्यास तो भविष्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी फायद्याचाच ठरेल. परिणामी, वेळीच योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.
प्राप्त माहितीनुसार, ३२८.६०० दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या धाम प्रकल्पात सध्या केवळ ८.३८ दलघमी उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. मागील दोन वर्षांत समाधानकारक पाऊस न झाल्याने तसेच सदर जलाशयही पाहिजे तसा भरला नसल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. परिणामी, वर्धा शहरासह परिसरातील १५ गावांमध्ये यंदा भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याचे दिसून येते. उल्लेखनिय म्हणजे मागील ३३ वर्षांपासून धाम प्रकल्पाची १.९० मिटरने उंची वाढविण्याचा विषय शासनदरबारी रेंगळत आहे. या प्रकल्पाची उंची वाढीच्या विषयाला वेळीच प्रत्यक्ष कृतीत आणले असते तर सध्या या जलाशयात पाणीसाठाही मोठ्या प्रमाणात राहिला असता. परंतु, जलाशयाच्या उंची वाढविण्याचा विषय वेळीच मार्गी न लागण्याला लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षी धोरणच कारणीभूत ठरत आहे. वर्धा जिल्ह्यात जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार आदी योजनेच्या माध्यमातून जलसंवर्धनाची कामे होत आहे. इतकेच नव्हे तर सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा पुरस्कारही वर्धा जिल्ह्यातील गावांना मिळाला. मात्र, विविध सामाजिक संघटना श्रमदानातून तसेच शासकीय अधिकारी सदर योजनेच्या माध्यमातून या प्रकल्पाला गाळमुक्त करण्याकडे पाठच दाखवित असल्याचे चित्र आहे. धाम जलाशयाने मागील साडे तीन दशकाच्या तुलनेत यंदा सर्वात जास्त तळ गाठला आहे. त्यामुळे यंदा या प्रकल्पातील मोठ्या प्रमाणात गाळही काढणे प्रशासनाला शक्य होऊ शकणार असून प्रत्यक्ष कृती होईल काय याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

भविष्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी धाम प्रकल्प गाळमुक्त होणे गरजेचे आहे. धाम जलाशयातील गाळ काढण्यास सुरूवात झाल्यावर तो गाळ परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकून घ्यावा यासाठी आपण स्वत: पुढाकार घेऊन त्या दिशेने काम करू. इतकेच नव्हे तर धाम गाळमुक्त व्हावा यासाठी आपण पं.स.च्या मासिक सभेत सदर प्रश्न मांडणार आहे.
- नीतीन अरबट, पं.स. सदस्य, आर्वी.

सध्या वर्धा शहरासह परिसरातील नागरिकांना भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. जर धामची उंची वेळीच वाढविली असती तर नागरिकांवर ही परिस्थिती ओढावली नसती. धाम जलाशयाला गाळमुक्त करण्यासाठी तसेच सदर प्रकल्पाची उंची वाढविण्यासाठी येत्या आठ दिवसात जिल्हा प्रशासनाने ठोस पाऊल न उचलल्यास युवा परिवर्तन की आवाज संघटना नागरिकांना सोबत घेऊन महाकाळी येथील धाम प्रकल्पातच तीव्र आंदोलन करेल.
- निहाल पांडे, संस्थापक अध्यक्ष, युवा परिवर्तन की आवाज संघटना.


Web Title: Drought-free 'Dham' will overcome future water congestion
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.