तुमच्या मुलांकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:31 AM2018-02-21T00:31:09+5:302018-02-21T00:32:19+5:30

वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावे म्हणून वाहतूक पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाद्वारे प्रयत्न केले जातात; पण अल्पवयीन वाहन चालकांच्या मुद्यावर सारेच हतबल होतात.

Do your kids have a driving license? | तुमच्या मुलांकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे काय?

तुमच्या मुलांकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे काय?

googlenewsNext
ठळक मुद्देएकाच दिवशी ६५ प्रकरणे : पालकांना बोलावून दिली समज

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावे म्हणून वाहतूक पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाद्वारे प्रयत्न केले जातात; पण अल्पवयीन वाहन चालकांच्या मुद्यावर सारेच हतबल होतात. यासाठी पालकांनाच समज देण्याची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेत आरटीओ व वाहतूक पोलिसांनी कारवाई करीत ६५ अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई केली. अशी कारवाई टाळण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांकडे ड्रायव्हींग लायसन्स आहे काय, हे तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.
शाळा, महाविद्यालय, शिकवणी वर्गाला जाण्यासाठी आता मुलांना मोटरसायकल, मोपेड घेऊन देण्याचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश विद्यार्थी दुचाकी वापरतात; पण ड्रायव्हींग लायसन्स काढण्याचा साधा विचारही त्यांच्या वा त्यांच्या पालकांच्या मनात डोकावत नाही. मग, कुठली अनुचित घटना घडली तर पोलिसांवरच दोष दिला जातो. सध्या वर्धा शहरासह जिल्ह्यात हा प्रकार वाढीस लागला आहे. अल्पवयीन वाहन चालकांची संख्या वाढतीवर आहे; पण त्या प्रमाणात ड्रायव्हींग लायसन्स काढले जात नसल्याचे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
खरोखर अल्पवयीन दुचाकी चालक म्हणजेच विद्यार्थ्यांकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे काय, हे तपासण्यासाठी १६ फेबु्रवारी रोजी उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलीस शाखेद्वारे चाचणी म्हणून कारवाईची विशेष मोहीम राबविण्यात आली. यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाजवळ राबविलेल्या या मोहिमेत तब्बल ६५ विद्यार्थ्यांकडे ड्रायव्हींग लायसन्स नसल्याचे समोर आले. वाहतूक पोलिसांनी ३५ प्रकरणे तर आरटीओद्वारे ३० प्रकरणांची नोंद घेण्यात आली. यातील दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. पालकांनी संपर्क साधल्यानंतर समज देत दुचाकी परत केल्यात. ही मोहीम अल्पवयीन तथा ड्रायव्हींग लायसन्स नसलेल्या मुलांविरूद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आली. अशा मोहीम आता नेहमी राबविल्या जाणार असल्याचेही वाहतूक पोलीस शाखेचे प्रमुख दत्तात्रय गुरव यांनी सांगितले. यामुळे पालकांनी पाल्यांकडे ड्रायव्हींग लायसन्स आहे की नाही, हे तपासणे व नसेल तर त्याची तरतूद करणे गरजेचे झाले आहे.
एक दिवसाची मोहीम पुरेशी आहे काय?
आरटीओ आणि वाहतूक नियंत्रण पोलीस शाखेने अल्पवयीन दुचाकी चालकांविरूद्ध एक दिवस कारवाईची मोहीम राबविली. एका दिवसांत ६५ प्रकरणेही नोंदविली; पण एक दिवसाची मोहीम नियम पाळणे शिकविण्यासाठी पूरेशी आहे काय, हा प्रश्नच आहे.
पालकांना जबाबदारीचे भान हवे
आपल्या अल्पवयीन पाल्याला दुचाकी घेऊन देत असताना त्यांना वाहन व्यवस्थित चालविता येते काय, वाहतूक नियम माहिती आहेत काय हे माहिती असणे गरजेचे आहे. शिवाय वाहन देत असताना ड्रायव्हींग लायसन्स काढून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ही पालकांची प्रमुख जबाबदारी असताना त्याचे कुणाला भान नसल्याचेच दिसते.

Web Title: Do your kids have a driving license?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.