१८ जणांवर दोषसिद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 01:23 AM2017-08-18T01:23:36+5:302017-08-18T01:24:09+5:30

येथील अमरावती-नागपूर महामार्गावर ठाणेगाव नजीक अ‍ॅक्सीस बँकेची कॅश व्हॅन लुटण्यात आली होती. तब्बल चार वर्षे चाललेल्या या प्रकरणात दोषसिद्धी झाली .......

Criminal conviction of 18 people | १८ जणांवर दोषसिद्धी

१८ जणांवर दोषसिद्धी

Next
ठळक मुद्देअ‍ॅक्सीस बँकेची कॅश व्हॅन लूट प्रकरण : शिक्षेकडे अनेकांच्या नजरा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील अमरावती-नागपूर महामार्गावर ठाणेगाव नजीक अ‍ॅक्सीस बँकेची कॅश व्हॅन लुटण्यात आली होती. तब्बल चार वर्षे चाललेल्या या प्रकरणात दोषसिद्धी झाली असून न्यायाधिश अनिरूद्ध चांदेकर यांनी १८ जणांना दोषी ठरविले असून चार जणांना निर्दोष मुक्त केल्याची माहिती न्यायालयीन सुत्रांनी दिली. या प्रकरणातील दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. दोषसिद्ध झालेल्या १८ जणांच्या शिक्षेबाबत शुक्रवारी (दि.१८) निर्णय घेण्यात येणार असून याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.
चंद्रशेखर मुदलीया, सल्लू कुमार सेलवा कुमार आऊंडर, शैलेंद्र उर्फ रवी मसराम, सचिन चंद्रप्रकाश श्रीवास्तव, शेख मुस्ताक उर्फ समीर शेख हमीद, रेहाण अक्रम बेग, रवींद्र उर्फ रवी मांडेकर, मंगल उर्फ सत्यप्रकाश नंदलाल यादव, प्रशांत रामबली वाघमारे, रवी उर्फ छोटू लिलाराम बागडे, मोहम्मद सादिक शेख मेहबूब, सुलेमान सूर्या युनूस सूर्या, मोबीन अहमदखान सेफउल्ला खान, शेख अलताब शेख मुनाफ, साधना किशोर इटले, अश्वीद सिंग उर्फ सोनू चव्हाण, पंकज उर्फ गब्बर कनोजे, मोहम्मद सलीम अब्दुल अजीज अशी दोष सिद्ध झालेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती न्यायालयीन सुत्रांनी दिली. तर वशिम यासिन शेख, शाकीर महंमद हुसेन, महंमद तौसिफ महंमद आणि विजय उर्फ विजू सोनेकर अशी निर्दोष सुटलेल्यांनी नावे असल्याची माहिती आहे.
कारंजा (घाडगे) पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७ मार्च २०१३ रोजी अ‍ॅक्सीस बँकेची कॅश व्हॅन लुटण्यात आली होती. ही व्हॅन अकोला येथून कॅश घेवून या मार्गे असलेल्या एटीएममध्ये रोख टाकत नागपूर येथे जात होती. ही व्हॅन ठाणेगाव शिवारात बंदूकीच्या धाकावर लुटण्यात आली. या व्हॅनमधून २ कोटी ३६ लाख ५० हजार रुपयांची रोख लंपास करण्यात आली होती. या प्रकरणी कारंजा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास करताना पोलिसांनी या प्रकरणी एकूण २४ जणांवर गुन्हा दाखल केला. तपासाअंती २२ जणांना अटक करण्यात आली. यातील दोन आरोपी अद्यापही फरार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून लुटीतील १ कोटी ५० लाख रुपयांची रोकड जमा करण्यात आली. तर १०० ग्रॅम वजनाचे तीन सोन्याचे शिक्के, सोन्याच्या दोन साखळ्या आणि फ्लॅट खरेदीकरिता दिलेला अ‍ॅडव्हान्सचे करारपत्र आदी जप्त करण्यात आले होते. सदर प्रकरण तपासाअंती न्यायालयात दाखल करण्यात आले होते.
सदर प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, दिनेश झामरे आणि एम.चाटे यांनी केला होता. तपासाअंती प्रकरण न्यायालयात सादर केले. यावर न्यायालयात सुनावणी सुरू असताना सहायक सरकारी वकील विनय घुडे यांनी एकूण ५० साक्षीदार तपासले. यात न्यायाधीश अनिरूद्ध चांदेकर यांनी गुरुवारी एकूण १८ जणांवर दोष सिद्ध केला. मात्र त्यांच्या या कृत्याबद्दल त्यांना काय शिक्षा देण्यात यावी या संदर्भात सुनावणीकरिता शासकीय वकिलांनी वेळ मागितल्याने यावर उद्या निर्णय होणार आहे. या दोषींना न्यायालय काय शिक्षा सुनावते, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.

प्रकरण निर्णयाप्रत, तरीही दोन आरोपी फरारच
बंदुकीच्या धाकावर कॅश व्हॅन लुटणाºया या प्रकरणात एकूण २४ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी २२ जणांना अटक करण्यात वर्धा पोलिसांना यश आले आहे. सदर प्रकरण शिक्षा होण्याच्या मार्गावर आले असताना यातील दोन आरोपींना अटक करण्यात वर्धा पोलिसांना अद्याप यश आले नाही. या फरार आरोपींना अटक होण्याची प्रतीक्षा अनेकांना आहे.

लुटमारीचा बनावट दिखावा करून मोठी रक्कम लांबविणाºया या प्रकरणात शासनाकडून एकूण ५० साक्षदार तपासण्यात आले. या साक्षदाराच्या बयानावरून आणि पुराव्यांवरून माननिय न्यायाधीशांनी १८ जणांवर दोषसिद्ध केला. याच्या निकालावर उद्या सुनावणी होणार असून न्यायालय काय शिक्षा देते, हे कळेलच.
- अ‍ॅड. विनय घुडे, सहायक शासकीय अभियोक्ता, वर्धा.

Web Title: Criminal conviction of 18 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.