Binder construction | बंधारा बांधकामात गैरप्रकार

ठळक मुद्देधाडी येथील प्रकार : सळाखींचा अत्यल्प वापर, मुख्य अभियंत्यांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : धाडी येथे बंधारा बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. परंतु, या कामात अत्यल्प सळाखींचा वापर होत असून कामातही गैरप्रकार होत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी मुख्य अभियंत्यांना केली आहे. सदर कामाची चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणीही त्या तक्रारीतून करण्यात आली आहे.
लघुसिंचन जलसंधारण विभागांतर्गत धाडी येथे कोल्हापूरी बंधारा बांधण्यात येत आहे. यासाठी एकूण ८० लाख रूपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. नागपूर येथील चौधरी कंस्ट्रक्शन कंपनीला ई-निविदेच्या माध्यमातून हा कंत्राट मिळाला आहे. एकूण ५५ मीटर लांब असलेल्या बंधाऱ्यासाठी अवघा १० एम.एम.चा लोहा वापरण्यात येत आहे. बांधकामादरम्यान सळाखी जवळ-जवळ असायला पाहिजे;पण तसे होताना येथे दिसत नाही. शिवाय सिमेंट, रेती, गिट्टीचे मिश्रणही नियमानुसार होताना दिसत नाही. या मिश्रणात सिमेंटचा नाममात्र वापर केल्या जात आहे. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण होत आहे.
नियमांना डावलून सुरू असलेल्या बांधकामामुळे भविष्यात बंधाऱ्याला तडा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. खोदकाम करताना हार्ड स्टाटा लागला नसताना वरवर स्ट्रक्चर उभे करून लिफ्ट चढविण्यात आली. त्यामुळे पायाही किती मजबुत असेल याबाबची चौकशी होणे गरजेचे आहे. धाम नदीच्या पात्रात सुरू असलेल्या कोल्हापूर बंधारा पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांना ये-जा करायला सोयीचे होणार आहे. मात्र, नियमांना डावलून सुरू असलेल्या बांधकामामुळे सदर बंधारा भविष्यात किती काळ टिकेल असा प्रश्न शेतकऱ्यांनी तक्रारीतुन उपस्थित केला आहे. सदर तक्रारीवर दिनेश लांडे, संजय कडू, रवींद्र चोरे, साहेबराव झामडे, विजय मानकर यांच्यासह सुमारे ६० शेतकºयांच्या स्वाक्षऱ्या आहेत. उपविभागीय अभियंता व शाखा अभियंत्यांनी घटनास्थळी येवून पाहणी करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. मागणीचा विचान न झाल्याच आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
८० लाखांचा खर्च वाया जाण्याची भीती
सदर बंधारा तयार करण्याचा कंत्राट नागपूर येथील चौधरी कंस्ट्रक्शन कंपनीला देण्यात आला आहे. या विकास कामासाठी सुमारे ८० लाखांचा निधी खर्च केल्या जाणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, सध्या सुरू असलेल्या मनमर्जी कामामुळे शासनाचा ८० लाखांचा निधी वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे. मागणीचा वेळीच विचार न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

सदर बंधाऱ्याचे बांधकाम कोल्हापूरी पद्धतीने सुरू आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुलासाखी मजबूती नसते. रहदारीसाठी याचा वापर केल्या जातो. काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. अंदाजपत्रक यापूर्वीच तयार झाले. त्यामुळे साचेबद्द काम होईल.
- एस. डी. ससाने, उपविभागीय अभियंता, लघुसचिंन जलसंधारण उपविभाग, आर्वी.