४.२८ लाख हेक्टरवर होणार लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:30 PM2019-06-13T23:30:09+5:302019-06-13T23:30:42+5:30

जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असले तरी मुसळधार पावसाची शेतकऱ्यांसह नागरिकांना प्रतीक्षा आहे. काही शेतकऱ्यांकडून धूळ पेरणीला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, जोवर कमीत कमी १०० मिमी पाऊस पडत नाही तोवर शेतकऱ्यांनीही पेरणी करू नये.

4.28 lakh hectare will be planted | ४.२८ लाख हेक्टरवर होणार लागवड

४.२८ लाख हेक्टरवर होणार लागवड

Next
ठळक मुद्दे१०० मि.मी. पावसानंतरच पेरणी करा : कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असले तरी मुसळधार पावसाची शेतकऱ्यांसह नागरिकांना प्रतीक्षा आहे. काही शेतकऱ्यांकडून धूळ पेरणीला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, जोवर कमीत कमी १०० मिमी पाऊस पडत नाही तोवर शेतकऱ्यांनीही पेरणी करू नये. अल्प पावसानंतर पेरणी झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढाऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
यंदा खरीब हंगामात एकूण ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. खरीप ज्वारी १ हजार १०० हेक्टर, ६५ हजार हेक्टरवर तूर, ४०० हेक्टरवर मुंग, ७०० हेक्टरवर उडीद, ६७५ हेक्टरवर खरीप भुईमुंग, १ लाख २५ हजार ९२५ हेक्टरवर सोयाबीन तर २ लाख ३५ हजार ५०० हेक्टरवर कापूस या पिकाची लागवड होणार आहे. असे असले तरी आतापर्यंत जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊसच न झाल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे. शिवाय ज्या शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीला मुबलक पाणी आहे अशाच शेतकऱ्यांकडून सध्या धूळ पेरणीला गती दिली जात आहे. तळेगाव (टा.), सेलू परिसरात सध्या धूळ पेरणी केल्या जात असल्याचे दिसून येते. मात्र, पावसाने दगा दिल्यास याही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार असल्याचे सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर खत आणि बियाण्यांची खरेदी करताना शेतकऱ्यांनी दक्ष राहूनच व्यवहार करावा, असेही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
बियाण्यांसाठी पैशाची जुळवाजुळव
मागील दोन वर्ष निसर्गाने दगा दिल्याने अनेक शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या उसनवारी आणि घरच्या लक्ष्मीचे सोन्याचे दागिणे गहाण ठेऊन बियाणे खरेदी करण्याच्या कामाला काही शेतकरी प्राधान्य देत आहे. अशातच दुबार पेरणीचा फटका अनेकांना न सहन करणाराच ठरणार असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
पीक कर्ज प्रस्ताव धूळ खात
वेळीच पीक कर्ज मिळाल्यास शेतकऱ्यांना बियाणे व खतांची खरेदी सहज करता येणार आहे. परंतु, काही बँकांमध्ये अनेक पीक कर्जचे प्रस्ताव धूळ खात असल्याचे दिसून येते. तर २४ जुलैपर्यंत पीक विमासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे याचाही लाभ शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
६ लाख ३९ हजार १४३ गाठी कापूस गाठींचे होणार उत्पन्न
२ लाख ३५ हजार ५०० हेक्टरवर पांढरे सोने अशी ओळख असलेल्या कापूस या पिकाची लागवड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. इतकेच नव्हे तर नैसर्गिक आपत्ती न येता शेतकऱ्यांवर निसर्ग मेहरबान राहिल्यास एकूण ६ लाख ३९ हजार १४३ गाठी कापसाचे उत्पन्न होण्याची शक्यता कृषी विभागाच्या तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.

८.९६ लाख क्विंटल उत्पादन होण्याची शक्यता
यंदाच्या वर्षी खरीप हंगामात ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर विविध पिकांची पेरणी होण्याची शक्यता आहे. निसर्गाने साथ दिल्यास यंदा हंगामाच्या शेवटी एकूण ८ लाख ९६ हजार ९७८ क्विंटल उत्पादन होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे.

येत्या काही दिवसात दमदार पाऊस आल्यावर शेतकरी पेरणीच्या कामाला वेग देणार आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी शेती करतानाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन दक्षच राहिले पाहिजे. शिवाय दुबार पेरणीला सामोरे जावे लागू नये म्हणून कमीत कमी १०० मिमी पाऊस झाल्या शिवाय पेरणी करू नये.
- डॉ. विद्या मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,
वर्धा.

Web Title: 4.28 lakh hectare will be planted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.