ठळक मुद्देआमदाराच्या हस्ते धनादेश वितरित

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : अस्वलीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकरी साहेबराव कालोकर रा. मुबारकपूर यांना वनविभागाकडून चार लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. सदर धनादेश आमदार अमर काळे यांच्या हस्ते जखमी शेतकºयाला देण्यात आला. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी, मनोहर येणूरकर आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी आ. काळे यांनी जखमी शेतकºयाला प्रकृतीची विचारणा केली. त्यावर अस्वलीने हल्ला केला. यात दोन्ही डोळे गेले. क्षणार्धात आयुष्याचे वाटोळ झाल. नियतीने माझे डोळे नेले त्यापेक्षा जीवच गेला असता तर दररोज होणाºया वेदना संपल्या असत्या असे म्हणत शेतकरी साहेबराव ठसाठसा रडला.
साहेबराव शेतात जात असताना अस्वलीने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी अस्वलीचे धारदार नख शेतकºयाच्या दोन्ही डोळ्यात गेल्याने शेतकºयाचे डोळे निकामी झाले. कुटूंबातील कर्ता असलेला साहेबराव अस्वलीच्या हल्ल्यात अंध झाल्याने वनविभागाच्यावतीने त्याला चार लाखांची शासकीय मदत देण्यात आली आहे. यावेळी आमदार काळे यांनी जखमी शेतकºयांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच मदतीचे आश्वासनही दिले. जखमी शेतकºयाला वेळीच शासकीय मदत मिळावी या हेतूने वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी स्वत: पुढाकार घेऊन तातडीने प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला. तसेच त्याबाबतचा पाठपूरावाही केला.
तालुक्यात अकरा शेतकºयांवर हल्ले करून अस्वलीने कहर केला होता. अस्वलीच्या हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले होते. तिच्या भीतीमुळे अनेक शेतकरी व शेतमजूर शेतात दिवसाला जाण्यासही घाबरत होते. या भागातील वन्यप्राणी मानववस्तीकडे येऊ नयेत यासाठी वन विभागाच्या अधिकाºयांनी योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी काही नागरिकांनी केली.