वर्धा जिल्ह्यातील पावणेचारशे गावे तहानलेलीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 02:38 PM2019-03-18T14:38:37+5:302019-03-18T14:40:34+5:30

यावर्षी झालेल्या अत्यल्प पर्जन्यमानामुळे भूगर्भातील पाणी पातळी खालावली असून जिल्ह्यातील १३ जलाशयांमध्ये केवळ १३.४३ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे.

375 villages in Wardha district are thirsty! | वर्धा जिल्ह्यातील पावणेचारशे गावे तहानलेलीच!

वर्धा जिल्ह्यातील पावणेचारशे गावे तहानलेलीच!

googlenewsNext
ठळक मुद्देअत्यल्प पर्जन्यमानाचा फटका केवळ १३.४३ टक्के जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यावर्षी झालेल्या अत्यल्प पर्जन्यमानामुळे भूगर्भातील पाणी पातळी खालावली असून जिल्ह्यातील १३ जलाशयांमध्ये केवळ १३.४३ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. मार्च महिन्यातच जिल्ह्यातील बहुतांश गावांना कमी-जास्त प्रमाणात पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असताना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या आकडेवारीवरून ३७३ गावे तहानलेली असल्याचे स्पष्ट होते. मार्च महिन्यातच ही स्थिती असून जून महिन्यापर्यंत जलसाठा टिकविण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभे ठाकले आहे.
जिल्ह्यात आर्वी, आष्टी, कारंजा, वर्धा, सेलू, देवळी, हिंगणघाट व समुद्रपूर असे आठ तालुके असून सद्यस्थितीत आर्वी, आष्टी, कारंजा व समुद्रपूर तालुक्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या परिसरात पहाटेपासूनच पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. सोबतच इतरही तालुक्यात पाणीबाणी निर्माण झाल्याने कुठे चार तर कुठे आठ दिवसांआठ पाणी पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात १३८७ गावांमिळून ४२९ ग्रामपंचायती आहेत. यातील अर्ध्याअधिक गावांमध्ये फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली. दिवसेंदिवस ही स्थिती गंभीर होत असताना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची उपाययोजना कागदोपत्रीच असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

पाणीपुरवठा विभागाचे कागदी घोडे
जिल्ह्यातील पाणी टंचाईसंदर्भात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ३७३ गावांकरिता ९५४ उपाययोजनांसाठी १५ कोटी ५९ लाख २५ हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये नवीन विंधन विहीर घेणे, नळ पाणीपुरवठा योजनेची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरीची विशेष दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळ योजना, टँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, विहिरी खोल करणे व गाळ काढणे, विहीर अधिग्रहण करणे, झिरे व बुडक्या घेणे, प्रगतिपथावरील योजना पूर्ण करणे, विंधन विहिरीचे जलभंजन करणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे. पण, आतापर्यंत ग्रामीण आर्वी तालुक्यात नांदपूर, बेल्हारा, सालदरा, सावंगी (पो.), पिंपळगाव (व.) जागखुटा व दिघी या ठिकाणी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. आतापर्यंत सात विहिरींचे अधिग्रहण झाले असून पाचची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

जलाशयात उपलब्ध असलेल्या जलसाठ्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नगरपालिका आदींना सूचना देण्यात आल्या आहेत. महिन्यातून एकदाच या जलाशयातून पाणी सोडले जाणार असून त्याची उचल करून संबंधितांनी त्या पाण्याचा पुरवठा नागरिकांना करणे अपेक्षित आहे.
एस. बी. काळे, कार्यकारी अभियंता
पाटबंधारे विभाग, वर्धा

Web Title: 375 villages in Wardha district are thirsty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी