3.46 lakh students in Wardha district will be given health pills | वर्धा जिल्ह्यातील ३.४६ लाख विद्यार्थ्यांना देणार जंतनाशक गोळ्या

ठळक मुद्दे१० फेब्रुवारीपासून विशेष मोहीमकृमीदोष टाळण्यासाठीचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार देशात सुमारे २८ टक्के मुलांना आतड्यांमध्ये वाढणाऱ्या परिजीवी जंतूपासून धोका आहे. हा धोका टाळण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत वर्धा जिल्ह्यातील ३ लाख ४६ हजार ७८० विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.
वर्धा जिल्ह्यात ग्रामीण भागात २ लाख २१ हजार ५८१ तर शहरी भागात १ लाख २५ हजार १९९ विद्यार्थी आहेत. त्यांना १० फेब्रुवारी रोजी या गोळ्या देण्यात येणार आहेत. निमशासकीय, नगर पालिका, जिल्हा परिषद, अंगणवाडी आदी ठिकाणी या गोळ्या आरोग्य विभागाच्यावतीने पोहोचविण्यात आल्या आहेत. या गोळ्या १ ते १९ वयोगटातील सर्वच बालकांना देण्यात येणार आहे. त्यापैकी १ ते २ वयोगटातील बालकांना अर्धी गोळी तर यावरील वयोगटातील बालकांना पूर्ण गोळी देण्यात येणार आहे.
मुलांमध्ये वाढत असलेल्या कृमीदोषाचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाच्यावतीने १० फेब्रुवारीला राष्ट्रीय जंतनाशक दिन व १५ फेब्रुवारीला मॉप अप दिन राबविण्यात येणार आहे. या दोन दिवसात या गोळ्यांचे वाटप करून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
जिल्ह्यात ९१६ शासकीय शाळा, ९१ शासकीय अनुदानित शाळा, ९ नगर पालिकेच्या शाळा, १४६ खासगी अनुदानित शाळा, अशा एकूण ११६२ शाळा व १४४१ अंगणवाड्या आहेत. यातील सर्वच बालकांना गोळ्या देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त शाळाबाह्य असलेल्या विद्यार्थ्यांना गोळ्या देण्याची जबाबदारी आशा स्वयंसेविकांमार्फत पार पाडण्यात येणार आहे.

मोहिमेतून कॉन्व्हेंटचे विद्यार्थी वगळले
या मोहिमेतून आरोग्य विभागाने शहरी व ग्रामीण भागात असलेल्या कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांना वगळल्याने या मोहिमेला भेदभावाचे गालबोट लागले आहे. शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत केवळ शासकीय, खासगी अनुदानित व अंगणवाडीतील बालकांना गोळ्या देण्याच्या सूचना आरोग्य विभागाला आहेत. बालकांसंदर्भात शासन भेदभाव करीत असून या निर्णयामुळे शासनाचे १०० टक्के उद्दीष्ट पूर्ण होणार नसल्याचे दिसत आहे.

कृमी दोषामुळे रक्ताशय आणि कुपोषण
बालकांमध्ये होणाऱ्या दीर्घकालीन कृमीदोषांमुळे रक्ताशय आणि कुपोषणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. यामुळे बालक कमजोर होतात. शिवाय त्यांची बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटण्याचा धोका आहे. देशात ५ वर्षांखालील मुला-मुलींमध्ये रक्ताशयाचे प्रमाण ७० टक्के आहे. तसेच १५ ते १९ वर्षे वयोगटातील ५६ टक्के किशोरवयीन मुलींमध्ये व ३० टक्के मुलांमध्ये रक्ताशय आढळून आला आहे. तसेच महाराष्ट्रात हे प्रमाण २९ टक्के आढळले आहे.