वर्धा जिल्ह्यातील १९१ गावांची जलयुक्त शिवाराकरिता निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 03:18 PM2018-04-19T15:18:18+5:302018-04-19T15:18:42+5:30

राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानात २०१८-१९ साठी १९१ गावांची निवड करण्यात आली आहे.

191 villages in Wardha district selected for Jalyukta Shiwar | वर्धा जिल्ह्यातील १९१ गावांची जलयुक्त शिवाराकरिता निवड

वर्धा जिल्ह्यातील १९१ गावांची जलयुक्त शिवाराकरिता निवड

Next
ठळक मुद्देजलयुक्त शिवार तीन वर्षात ४१६ गावे जलपरिपूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानात २०१८-१९ साठी १९१ गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये वर्धा ३३, सेलू २८, देवळी ३५, आर्वी १५, आष्टी १८, कारंजा २४, हिंगणघाट १५ आणि समुद्रपूर २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे.
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. पण ते सर्व घेण्यासाठी आपलीच ओंजळ खुजी पडते. यावर्षी पाऊस कमी झाला म्हणून आपण निसर्गाच्या नावाने ओरडतो. पडणाऱ्या पावसापैकी ६० टक्के पाणी हे नदी नाल्यांमार्फत वाहून जाते. म्हणूनच वाया जाणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाला अडवण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला. २०१९ पर्यंत राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. यामध्ये पावसाचे पाणी साठवण्यासाठी आणि जिरवण्यासाठी अनेक उपचार कामे करण्यात आलीत.
२०१५ मध्ये सुरू झालेल्या या योजनेचे सकारात्मक परिणाम दिसायला लागल्यावर सामाजिक संस्थाही सहभागीसाठी पुढे सरसावल्या. तसेच अनेक कार्पोरेट कंपन्यांनी सामाजिक दायित्व निधी जलयुक्तच्याकामासाठी देणे सुरू केले. शिवाय लोकांचा सहभाग वाढल्याने ही योजना खऱ्या अर्थाने लोकांची योजना म्हणून यशस्वी ठरली. यावर्षी जिल्ह्यात सरासरी पाऊस कमी असूनही एप्रिल महिन्यात सुद्धा अनेक नाल्यांमध्ये पाणी पाहायला मिळते. या पाण्यामुळे त्या भागातील भूजल पातळी कायम राखण्यास निश्चितच मदत होत आहे.
जिल्ह्यात २०१५-१६ पासून सुरू झालेल्या या योजनेत पहिल्या वर्षी २१४ गावांचा समावेश होता. यापैकी १७३ गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. २०१६-१७ मध्ये निवडण्यात आलेल्या २१० गावांमध्ये २४३९ कामांच्या माध्यमातून सर्व गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. तसेच २०१७-१८ मध्ये निवडण्यात आलेल्या १४४ गावांपैकी ३३ गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. यापैकी ३३ गावांमध्ये १०० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. ४३ गावांमध्ये ८० टक्के तर ६८ गावांमध्ये ५० टक्के काम झाले आहे. २०१७-१८ मधील सर्व शिल्लक कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावीत. तसेच २०१८-१९ मध्ये निवडण्यात आलेल्या गावांमध्ये १ मे पर्यंत लोकप्रतिनिधींच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करून कामे तात्काळ सुरू करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिलेत. जलयुक्त शिवार अभियानात नालाखोलीकरणाच्या कामामुळे पांदण खराब होत असल्यास, शेतकऱ्यांना पांदण वहिवाटीसाठी सुरू ठेवण्यासाठी त्या ठिकाणी बॅरेज कम बंधारा तयार करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्यात.

यशोदा नदीचे १६० कि.मी.चे काम पूर्ण
यशोदा नदी खोरे पुनर्जीवन प्रकल्प जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राज्य शासन, सामाजिक संस्था आणि लोकसहभागातून राबविण्यात येत आहे. कमलनयन जानकीदेवी बजाज फॉऊंडेशन संस्था या कामात सहभागी आहे. यात आर्वी, वर्धा, देवळी हिगणघाट तालुक्यातील १४३ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. ६ लघु पाणलोट क्षेत्रात वाहणारी नदी व तिला संलग्नित नाल्यांचे ६३० किलोमिटरचे खोलीकरण व सरळीकरणाचे काम यामध्ये करण्यात येत आहे. यामुळे २ लक्ष ५ हजार ४३८ एकर जमिनीला फायदा होणार असून २७ हजार ९८९ शेतकरी कुटुंबाना याचा लाभ होईल.
२०१६-१७ पासून या कामाला सुरूवात झाली असून सद्यास्थितीत २६३.८९ किलोमिटर पर्यंतचे काम झालेले आहे. यामध्ये ३८ लक्ष ७० हजार ५३९ घनफुट गाळ काढण्यात आला असून यामुळे ३ हजार ८७१ टी सीएम पाणी साठा क्षमता निर्माण झाली आहे. यासाठी २० कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे. याचा लाभ ८ हजार शेतकरी कुटुंबाना होणार आहे. तर ५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. उर्वरित ३६६ किलोमिटरचे काम प्रगतीपथावर आहे.

 

Web Title: 191 villages in Wardha district selected for Jalyukta Shiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.