पालिकेची कारवाई : सडक्या अन्नामुळे परिसरातील नागरिक त्रस्त
वर्धा : हॉटेलात उरलेले शिळे अन्न पालिकेच्या नालीत टाकून ती तुंबण्यास कारण ठरलेल्या आर्वी नाका परिसरातील नवदूर्गा स्वीट मार्टला १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली.
नवदूर्गा स्वीट मार्टच्यावतीने त्याच्या हॉटेलात तयार करण्यात येत असलेल्या पदार्थांपैकी शिल्लक असलेले पदार्थ व काही इतर अन्न हॉटेल परिसरात असलेल्या पालिकेच्या मालकीच्या नालीत टाकण्यात येत होते. परिणामी या नालीत हे अन्न सडून त्याची दुर्गंघी पसरत असल्याची ओरड होती. यातच पालिकेच्यावतीने शहरातील हॉटेल तपासणीची मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेंतर्गत सदर हॉटेलवर धाड टाकुन चौकशी केली असता हा प्रकार उघड झाला. शिवाय हॉटेल मालकाच्या गोदामाची तपासणी केली असता त्यात स्वच्छतेचा अभाव असल्याचे दिसून आले आहे. सदर हॉटेल मालकाकडे पालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र व येथे काम करणाऱ्या कामगारांच्या वैद्यकीय तपासणीचा अहवालही नसल्याचे दिसून आले. यामुळे सदर हॉटेल मालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरातील स्वच्छता कायम राखण्याकरिता व नागरिकांच्या आरोग्याप्रती पालिकेच्यावतीने ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. आतापर्यंत शहरातल तीन हॉटेल्सवर कारवाई केली असून मुख्याधिकारी आश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनात प्रशासकीय अधिकारी अजय बागरे, अशोक ठाकूर, देव, राजू निखाडे, नाहारकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबविली.(प्रतिनिधी)

दंडाची रक्कम कार्यवाहीच्या वेळीच वसूल
पालिकेच्यावतीने हॉटेल्सची तपासणी करीत असताना आढळलेल्या त्रुटीनुसार आकारण्यात येणारा दंड हा त्याचवेळी वसूल करण्यात येत आहे. मंगळवारी करण्यात आलेला १५ हजार रुपयांचा दंड हॉटेल मालकाकडून वसूल करण्यात आल्याची माहिती पालिकेच्यावतीने यावेळी देण्यात आली आहे.