जलयुक्त शिवारमुळे दीड लाख हेक्टर संरक्षित सिंचन क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 10:31 PM2018-12-11T22:31:38+5:302018-12-11T22:32:23+5:30

जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे केवळ सिंचन क्षमताच वाढली नाही तर असंख्य गावांचा पाण्याचा ताळेबंद तयार झाला आहे. वर्धा  जिल्ह्यात मागील तीन वर्षात जलयुक्त शिवारमध्ये ५६८ गावाची निवड करण्यात आली होती.

1.5 lakh hectare irrigated irrigation capacity due to irrigation | जलयुक्त शिवारमुळे दीड लाख हेक्टर संरक्षित सिंचन क्षमता

जलयुक्त शिवारमुळे दीड लाख हेक्टर संरक्षित सिंचन क्षमता

googlenewsNext
ठळक मुद्देशेतीला संजीवनी : ८० हजार ९५१ टीएमसी पाणीसाठ्याची उपलब्धी, अभियानात विविध संस्थांचा लागला हातभार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे केवळ सिंचन क्षमताच वाढली नाही तर असंख्य गावांचा पाण्याचा ताळेबंद तयार झाला आहे. वर्धा  जिल्ह्यात मागील तीन वर्षात जलयुक्त शिवारमध्ये ५६८ गावाची निवड करण्यात आली होती. या गावांमध्ये झालेल्या कामांमधून १ लाख ५१ हजार ५३६ हेक्टर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. याचा असंख्य शेतकऱ्यांना लाभ झाला असून शेतीलाही संजीवनी मिळाली आहे.
पावसाचे पाणी शिवारातच अडवून भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे, विकेंद्रित जलसाठे निर्माण करणे, अस्तित्वात असलेल्या आणि निकामी झालेल्या जलस्रोतांची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापीत करणे, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे आणि पाणी अडविण्याच्या कामात लोकसहभाग वाढविणे हा उद्देश घेऊन २०१५ पासून ही योजना जिल्ह्यात राबविण्यात आली. कृषि विभाग, जलसंधारण (राज्य), जिल्हा परिषद लघुसिंचन विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, वन विभाग, सामाजिक वनीकरण, पाटबंधारे विभाग, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा इत्यादी विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली. २०१५-१६ मध्ये ८ तालुक्यातील २१४ गावांची या अभियानात निवड करण्यात आली होती.
कृषी विभाग, लघुसिंचन जिल्हा परिषद, लघुसिंचन राज्य, भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, वनविभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, यशोदा नदी पुनर्जीवन विकास प्रकल्पाअंतर्गत २१४ गावातील २ हजार ९२७ कामे पूर्ण करण्यात आली. दुष्काळावर मात करण्यासाठी सुरु केलेल्या या अभियानामुळे २०१५-१६ मध्ये सर्वच २१४ गावे शंभरटक्के वॉटर न्युट्रल झाली आहे. या कामामुळे जिल्ह्यात या वर्षात ७४ हजार ९१६ हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. तसेच ३७ हजार ४५८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या पाण्यामुळे पावसाच्या खंड काळात कोमेजलेल्या पिकांना संजीवनी दिली आहे. सन २०१६-१७ मध्ये २१० गावाची निवड करण्यात आली असून या गावात २ हजार ३८७ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. ती सर्व कामे पुर्ण करण्यात आली आहे. यावर ९३ कोटी २१ लाख ५६ हजार रुपये खर्च झाला.
भूजल पातळीत झाली वाढ
या कामांमुळे २७ हजार ६६० टीसीएम पाणीसाठा उपलब्ध झाला.पूर्ण करण्यात आलेल्या जलयुक्त शिवारच्या कामामधून ५८ हजार ९५४ हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. या वर्षात निवडण्यात आलेल्या २१० गावांपैकी १४३ गांवे शंभर टक्के वाटर न्युट्रल झाली आहेत. वरिष्ठ भुवैज्ञानिक भुजल विकास यंत्रणा यांनी सर्वेक्षण केलेल्या गावामध्ये ०.२०. ते २.६० मीटरने भूजल पातळीमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.

सन २०१७-१८ मध्ये जिल्हयातील १४४ गावांची निवड करण्यात आली असून विविध यंत्रणांमार्फत १ हजार ४५९ कामे प्रस्तावित केली आहेत. यापैकी १ हजार ४२५ कामे पूर्ण झालेली असून उर्वरीत कामे प्रगतीपथावर आहे. या सर्व कामामुळे १५ हजार ८३३ टीसीएम पाणीसाठा उपलब्ध होऊन अंदाजे २८ हजार ६६६ हेक्टर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.
मागील तीन वर्षात ८० हजार ९५१ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला असून १ लाख ५१ हजार ५३६ हेक्टर सरंक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. जलयुक्त शिवारच्या कामासाठी राज्य शासन सोबतच कमलनयन बजाज फाउंडेशन, टाटा ट्रस्ट, सिध्दिविनायक ट्रस्ट, साईबाबा ट्रस्ट, जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टचा निधी तसेच लोकसहभाग महत्वाचा ठरत आहे.
 

Web Title: 1.5 lakh hectare irrigated irrigation capacity due to irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.