काक्रंबा (जि. उस्मानाबाद) : किरकोळ वादातून तोंडावर व डोक्यावर तलवारीने वार करून पत्नीचा खून केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी तुकाराम भागवत कांबळे (३५) याला ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
तुकाराम काक्रंबा गावचा रहिवासी असून, गेल्या काही महिन्यांपासून पत्नी राजश्री व चार मुलांसह तो तुळजापूर येथे राहात होता. बुधवारी सकाळी तो पत्नी व मुलांना घेऊन काक्रंबा येथे घरी आला होता. सकाळी साडेअकराच्या सुमारास त्याने मुलांना दुकानात पाठवून पत्नी राजश्री यांचा खून केला.
त्यानंतर मोठ्या मुलाला सोबत घेऊन तो तुळजापूरच्या दिशेने निघाला होता. मात्र पोलिसांनी शिवाजी नगरमध्ये त्याला शिताफीने अटक केली. खुनासाठी वापरलेली तलवारीही त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली आहे.