ठळक मुद्देकळंब-लातूर राज्यमार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्यानी उसाला पहिला हप्ता २ हजार ६०० रुपये द्यावा, यासाठी रास्तारोको केला परंडा तालुक्यातील कंडारी फाटा येथेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़

उस्मानाबाद : ऊसदर व पहिली उचल जाहीर करण्याच्या मागणीसाठी एकिकडे ऊस उत्पादकांनी स्वतंत्रपणे मोर्चा उघडला असताना आता स्वाभिमानी शेतकरी संघटनाही रस्त्यावर उतरली आहे़ मंगळवारी जिल्ह्यातील कंडारी फाटा व शिराढोण येथे आंदोलकांनी राज्यमार्ग रोखून सरकारविरोधी घोषणाबाजी केली़

कळंब तालुक्यातील शिराढोण येथील कळंब-लातूर राज्यमार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्यानी उसाला पहिला हप्ता २ हजार ६०० रुपये द्यावा, यासाठी रास्तारोको करुन दोन तास चक्का जाम केला. उसाची तोडणी सुरु होवून वीस दिवस उलटल्यानंतरही परिसरातील कारखान्यांनी भाव जाहीर केला नाही. ज्यांनी जाहीर केला तो कमी आहे. याअनुषंगाने मंगळवारी सकाळी दहा वाजता हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि इंगळे, जिल्हा संघटक नामदेव माकोडे, तालुकाध्यक्ष विष्णुदास काळे, विभाग प्रमुख संजय शेळके, कमलाकर पवार, राजेंद्र वाघमारे, राजपाल देशमुख, संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य अमोल माकोडे, पवन म्हेत्रे यांच्यासह शेतक-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.  

दरम्यान, परंडा तालुक्यातील कंडारी फाटा येथेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ शेतक-यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत उठणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता़ त्यामुळे  भूमचे उपविभागीय अधिकारी, पोलीस उपाधीक्षक, तहसीलदारांनी आंदोलनस्ळी जावून त्यांच्याशी चर्चा केली़ लवकरच संबंधित विभागातील अधिका-यांसोबत बैठक लावून प्रशन मार्गी लावण्याचे आश्वासन अधिका-यांनी दिल्यानंतर आंदोलकांनी माघार घेतली़ यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते़


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.