चांगल्या कॉलेजला प्रवेश न मिळण्याच्या भीतीने आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:48 PM2019-06-21T13:48:50+5:302019-06-21T13:49:15+5:30

‘‘सत्कार आता नको, मला चांगले कॉलेज मिळू द्या, मग मदत करा’ सत्काराला दिले होते प्रत्युत्तर

Suicide due to lack of access to a good college in Usmanabad | चांगल्या कॉलेजला प्रवेश न मिळण्याच्या भीतीने आत्महत्या

चांगल्या कॉलेजला प्रवेश न मिळण्याच्या भीतीने आत्महत्या

googlenewsNext

कळंब  (जि. उस्मानाबाद) : कुटुंबाच्या वंशाचा दिवा असलेल्या अक्षय देवकर (१६) या विद्यार्थ्याने दहावीत प्रतिकूल स्थितीत ९४.२० टक्के गुण घेऊन बाजी मारली. परंतु, बेताची आर्थिक स्थिती पुढे शिक्षणात ‘तग’ धरेल का? या भयाने मात्र त्याला जीवनाच्या परीक्षेत अपयशी ठरवल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील देवळाली येथे गुरुवारी घडली आहे.

शहाजी गोविंद देवकर हे देवळाली गावातील एक अल्पभूधारक कोरडवाहू शेतकरी. जेमतेम तीन एकर जमीन. यात दुष्काळ पाचवीला पुजलेला. वारंवार निर्माण होत असलेल्या दुष्टचक्राशी संघर्ष करत असलेल्या शहाजी यांचा एकुलता एक मुलगा अक्षय हा कुशाग्र बुद्धिमत्तेचा. यामुळेच परिस्थितीशी दोन हात करत शहाजी यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी लातूरची निवड केली. याठिकाणी मुलात दरवर्षी सुधारणा होत होती. कोणतेही विशेष ‘क्लास’ न लावता त्याने प्रत्येक वर्गात विशेष प्रावीण्य मिळविणे सुरू ठेवले होते. नुकतीच त्याची लातूर येथील एका खाजगी शाळेत दहावी झाली होती. निकालात तो शाळेत ९४.२० टक्के गुण घेऊन अव्वल ठरला होता. अशा या होतकरू अक्षयला डॉक्टर व्हायचे होते. यासाठी तो लातुरातील नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळावा अशी महत्त्वाकांक्षा बाळगून होता. त्यासाठी त्याने प्रवेश अर्जही दाखल केला होता. परंतु, या सर्व प्रवासात त्याला आपण चांगले गुण घेतले असले तरी वाढत्या स्पर्धेत आपल्याला चांगले कॉलेज मिळेल का? बेताच्या आर्थिक स्थितीत आपण तग धरू का? अशी भीती त्याला सतत सतावत होती. अलीकडे तो हा विषय जवळच्या मित्रांना व घरातील व्यक्तींना बोलून दाखवत होता. शेवटी या भीतीतून निर्माण झालेल्या वैफल्यातून अक्षय या १६ वर्षीय मुलाने दुर्दैवी मार्ग पत्करला. आपली आई केज तालुक्यातील माहेरी व वडील शहाजी हे शेतात गेले असताना अक्षयने गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात  गळफास घेऊन आत्महत्या केली. आई निर्मला या माहेरून परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, अक्षय याच्यावर देवळाली गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी शिराढोण पोलीसांनी घटनेची नोंद करण्यात आली आहे.

सत्काराचे नंतर पाहू
होतकरू अक्षय याचा गावातील काही युवकांनी सत्कार आयोजित केला होता; परंतु, संवेदनशील मनाच्या अक्षयने तो सत्कार नाकारला. ‘‘सत्कार आता नको, मला चांगले कॉलेज मिळू द्या, मग मदत करा’ असे त्याने म्हटल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

परिसरातील तिसरी घटना
गतवर्षी मार्च महिन्यात याच गावातील तृष्णा तानाजी माने या १९ वर्षीय विद्यार्थ्यांनीने आत्महत्या केली होती. शिवाय पिंपरी (शि) येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रगती राऊत या २० वर्षीय विद्यार्थिनीने गत नोव्हेंबर महिन्यात आत्महत्या केली होती. या भागातील ही अलीकडील काळातील तिसरी घटना आहे.

Web Title: Suicide due to lack of access to a good college in Usmanabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.