Sachin Tendulkar visits Donja village | डोंजा गावक-यांची सचिन तेंडुलकरला बॉलिंग, पण एकही चेंडू बॅटला नाही लागला   

उस्मानाबाद - सांसद आदर्श ग्राम योजनेत दत्तक घेतलेल्या परंडा तालुक्यातील डोंजा गावाला मास्टर ब्लास्टर आणि खासदार सचिन तेंडुलकरने मंगळवारी भेट दिली. यावेळी सचिनने गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांसोबत क्रिकेटचा आनंद घेतला. खुद्द सचिन तेंडुलकरसोबत क्रिकेट खेळायला मिळत असल्याने मुलं आणि गावकरी चांगलेच आनंदात होते. सचिनला बॉलिंगही करण्यात आली. पण आनंदाच्या भरात गावक-यांनी सगळे बॉल वाईड टाकले त्यामुळे एकही बॉल सचिनच्या बॅटला लागला नाही. पण सचिनसोबत खेळण्याचा आनंद मात्र सगळ्यांनी लुटला.

गावात दाखल होताच ग्रामस्थांकडून झालेल्या जंगी स्वागतानंतर सचिनने पहिल्यांदा येथील जिल्हा परिषद शाळेस भेट देऊन बांधकामाची पाहणी केली. त्यानंतर क्रिकेटच्या मैदानावर जाऊन विद्यार्थ्यांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. मात्र, सचिनच्या चाहत्यांनी मैदान गच्च भरले होते. अगदी पिचभोवतीही गराडा पडल्याने सचिनला मनसोक्त टोलेबाजी करता आली नाही. त्याने विद्यार्थ्यांनी केलेल्या गोलंदाजीवर ‘डिफेन्स’चे कौशल्य सादर केले

यानंतर शाळेच्या बंद खोलीत काही मोजक्या विद्यार्थ्यांसोबत त्याने संवाद साधून खेळाइतकेच शिक्षणही महत्वाचे सांगितले व विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शाळेच्या बांधकामासोबतच सचिन गावातील विविध विकासकामांची पाहणी पायी फिरुन करणार आहे. तसेच ग्रामस्थांशी संवादही साधणार आहे.

सचिनच्या स्वागतासाठी उभारल्या गुढी 
प्रत्येक घरावर गुढी उभारण्यात आली असून, दारात रांगोळ्या सजल्या आहेत. गावच्या वेशीतच भव्य अशी कमान लक्ष वेधत आहे. गावातील अबाल-वृद्ध सचिनची आतुरतेने वाट पाहत होती.

खासदार आदर्श गाव योजनेअंतर्गत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंध्र प्रदेशमधील पुट्टमराजू कन्ड्रिगा गावाचा कायापालट केला. त्यानंतर गेल्या वर्षी सचिनने महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील डोंजा गाव दत्तक घेतलं.