ठळक मुद्देवाशी तालुक्यातील इंदापूर-गोजवडा- तेरखेड्याच्या सरहद्दीवर समीर मुलानी यांचा रॉयल फ ायर वर्क्स या नावाने फटाके बनविण्याचा कारखाना आहे. मुख्य गोडाऊनमध्ये सकाळी कच्चा माल काढण्यासाठी दोघेजण गेले असता हा स्फ ोट झाला. या स्फ ोटामध्ये मुख्य गोडाऊनच्या छतासह भिंंतीच्या विटा दूरवर फेकल्या गेल्या.

वाशी (जि. उस्मानाबाद) : वाशी तालुक्यातील इंदापूर येथील फटाका कारखान्यात स्फोट होवून एक मजूर जागीच ठार तर कारखाना मालकाचा एक नातलग गंभीर जखमी झाला. ही घटना वाशी तालुक्यातील इंदापूर येथे शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. स्फोट एवढा मोठा होता की सदर इमारत स्लॅपसह जमीनदोस्त होऊन भिंंतीच्या विटा शंभर फूट दूरपर्यंत फेकल्या गेल्या. 

वाशी तालुक्यातील इंदापूर-गोजवडा- तेरखेड्याच्या सरहद्दीवर समीर मुलानी यांचा रॉयल फ ायर वर्क्स या नावाने फटाके बनविण्याचा कारखाना आहे. या कारखान्याच्या मुख्य गोडाऊनमध्ये सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास जोरदार स्फोट  होऊन कामगार रवींद्र दत्तू लगाडे (वय ५०, रा. इंदापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारखाना मालकाचा नातलग सोहेल शेख (वय १९, रा. तेरखेडा) हा गंभीर जखमी झाला. जखमीस तात्काळ उस्मानाबाद येथील शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. 

फटाका बनवण्याच्या मुख्य गोडाऊनमध्ये सकाळी कच्चा माल काढण्यासाठी दोघेजण गेले असता हा स्फ ोट झाला. या स्फ ोटामध्ये मुख्य गोडाऊनच्या छतासह भिंंतीच्या विटा दूरवर फेकल्या गेल्या. यामध्ये रवींद्र लगाडे यांच्या अंगावर भिंंत पडून ते त्याखाली दबले गेले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला़ तर सोहेल शेख हा स्फोटाच्या तीव्रतेमुळे दूरवर फेकला जावून गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती कळताच प्रभारी जिल्हाधिकारी अविनाश पाठक, भूमचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिध्देश्वर धुमाळ, तहसीलदार डॉ. संदीप राजापुरे, पोलीस निरीक्षक दिनकर डंबाळे, पोलीस उपनिरीक्षक मोतीराम बगाड यांच्यासह महसूल व पोलीस दलाच्या कर्मचा-यांनी भेट देऊन घटनेची पाहणी केली. मयतास पोलीसांनी ढिगा-याखालून बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले.

हा २५ वा बळी 
दरम्यान प्रभारी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी वाशीच्या तहसीलदाराना पंचनामा करून वस्तुनिष्ठ अहवाल पाठवण्याच्या सूचना केल्या. तहसीलदारांच्या अहवालानंतर फटाका कारखान्यावर नियमानुसार कारवाई होणार आहे. दर एक ते दोन वर्षानंतर तालुक्यातील फटाक्याच्या कारखान्यात स्फोट होण्याची शृंखला चालूच असून, आजतागायत जवळपास २५ जणांना प्राणास मुकावे लागले आहे. दरम्यान, शनिवारी स्फोट होताच कारखान्याच्या आवारातील फटाके बनविण्याची दारू गायब करण्यासाठी धावपळ होताना दिसून आली.