...'येथे' भाविकांच्या भेटीसाठी विठ्ठलाची दिंडी जाते थेट स्मशानभूमीत; साडेसातशे वर्षांची आहे परंपरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 06:05 PM2018-07-27T18:05:11+5:302018-07-27T18:08:42+5:30

साडेसातशे वर्षांपूर्वी गावात लोकदेवता विठ्ठलाचा दिंडी सोहळा सुरू करणाऱ्या  भाविकांना भेटण्यासाठी चक्क विठ्ठलाची दिंडीच स्मशानभूमीत जाते.

... here, 'Wari of Vitthala' goes to the crematorium for the visit of devotees; It is a seven hundred and fifty years old tradition | ...'येथे' भाविकांच्या भेटीसाठी विठ्ठलाची दिंडी जाते थेट स्मशानभूमीत; साडेसातशे वर्षांची आहे परंपरा 

...'येथे' भाविकांच्या भेटीसाठी विठ्ठलाची दिंडी जाते थेट स्मशानभूमीत; साडेसातशे वर्षांची आहे परंपरा 

googlenewsNext
ठळक मुद्देअख्खा गाव स्मशानभूमीत विठ्ठलाच्या दिंडीसह उभा होतो आणि आपल्या पूर्वजांना टाळ-मृदंगाच्या गजरात अभिवादन करतो.भाविकांच्या भेटीसाठी स्मशानभूमीत जाणारी विठ्ठल दिंडी ही अनोखी प्रथा मागील सुमारे सहाशे वर्षांपासून सुरू आहे.

उस्मानाबाद : साडेसातशे वर्षांपूर्वी गावात लोकदेवता विठ्ठलाचा दिंडी सोहळा सुरू करणाऱ्या  भाविकांना भेटण्यासाठी चक्क विठ्ठलाची दिंडीच स्मशानभूमीत जाते. अख्खा गाव स्मशानभूमीत विठ्ठलाच्या दिंडीसह उभा होतो आणि आपल्या पूर्वजांना टाळ-मृदंगाच्या गजरात अभिवादन करतो. भाविकांच्या भेटीसाठी स्मशानभूमीत जाणारी विठ्ठल दिंडी ही अनोखी प्रथा मागील सुमारे सहाशे वर्षांपासून आळणी या गावात सुरू आहे. या अनोख्या प्रथेबरोबरच चंद्रभागाबाई देवी हे नदीच्या नावाने मंदीर अनेकांच्या कौतूकास पात्र ठरत आहे. 

उस्मानाबाद शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या आळणी गावात शुक्रवारी वारकऱ्यांचा मेळा जमला होता. राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरीकडे धाव घेणाऱ्या वारकऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र आळणी गावात साक्षात विठ्ठलच आपल्या भाविकांना भेटण्यासाठी स्मशानभूमीत जातो. विशेष म्हणजे या दिंडीत हिंदू, मुस्लिम यांच्यासह गावातील अठरापगड जातीचे भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.  स्मशानभूमी म्हणजे अंत्यविधीखेरीज त्या ठिकाणी जाण्याचे दुसरे प्रयोजन नाही. या सर्व बाबींना छेद देत गावातील एकोपा निर्माण करण्यास कारणीभूत असलेला दिंडी सोहळा ज्या पूर्वजांनी सुरू केला, त्यांना विठ्ठलाचे दर्शन घडवून आणण्याची ही अनोखी प्रथा राज्यात बहुदा केवळ आळणी येथेच सुरू असावी.

दिंडीसाठी मुली येतात माहेरी 
आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास विठ्ठल मंदिरातून निघालेला हा दिंडी सोहळा गावाला वळसा घालून स्मशानभूमीत गेला. तेथे अभिवादन करून पुन्हा गावाच्या हमरस्त्यावरून मंदिरात येवून आरतीने दिंडीने समारोप करण्यात आला. एकवेळ दिवाळीला माहेरवासीन गावाकडे येणार नाही. मात्र या दिंडीकडे हमखास मुली माहेरी येतात, अशा शब्दात बाळासाहेब वीर यांनी महती विशद केली. 'विठू माझा लेकुरवाळा' हा जीवंत देखावा सादर करणारे बाळासाहेब वीर आपल्या या अभिमानास्पद वारशाबद्दल न थकता बोलतात. 

बंधुभाव आणि समानतेचे प्रतिक 
गावातील दिंडी सोहळ्यातील मानकरी तांबेबुवा महाराज यांनी गोरोबाकाका आणि विठ्ठल या दोन्ही वाऱ्यांची गावात असलेली परंपरा सांगितली. टाळ-मृदंग आणि पखवाजाच्या आवाजात सुरू असलेल्या दिंडी सोहळ्यात आपल्या चार वर्षाच्या नातवाला सोबत घेवून हमरोद्दीन मुजावर साखर आणि पेढे वाटत होते. वारकरी सांप्रदायाला अपेक्षित असलेला बंधुभाव आणि समानता हे या दिंडी सोहळ्याचे खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे गावातील हरिनाम सप्ताह दरवर्षी मुस्लिम बांधव स्व:खर्चाने पंगत घालत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. 

Web Title: ... here, 'Wari of Vitthala' goes to the crematorium for the visit of devotees; It is a seven hundred and fifty years old tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.