ठळक मुद्देटेम्पो महामार्गावरील सांगवी (मार्डी) गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्याने उलटला़ आॅटोला घाटातील वळणावर समोरुन येणा-या कंटनेरने जोराची धडक दिली़

तुळजापूर (उस्मानाबाद) : येथील सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळी घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात ५ जण ठार झाले आहेत़ त्यापैकी तिघे तुळजाभवानीचे दर्शन घेऊन सोलापूरकडे परतत होते़ तर दोघे लग्नकार्यासाठी निघालेले व-हाडी होते़

उदगीरजवळील बामाजीचीवाडी (जि़लातूर) येथील व-हाडींना घेऊन सोलापूरच्या दिशेने निघालेला टेम्पो महामार्गावरील सांगवी (मार्डी) गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्याने उलटला़ या घटनेत बामाजीचीवाडी येथील वैष्णवी अभंग चोपडे (१३), नरसिंग मल्हारी मुगळे (७०) हे जागीच ठार झाले आहेत. तर नियोजित वधूसह २२ व-हाडी जखमी झाले आहेत़ जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़

दुसरा अपघात हा तुळजापूर घाटातील वळणावर सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडला़ सोलापूर येथील भाविक तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन एमएच १३ जी ९६०९ क्रमांकाच्या आॅटोने परत निघाले होते़ यावेळी घाटातील वळणावर समोरुन येणा-या कंटनेरने (एनएल ०१ एए ७८२१) जोराची धडक दिली़ या घटनेत रिक्षाचालक दीपक गोवर्धन पुट्टा (२१), योगेश राजु महेंद्रकर (१९) व व्यंकटेश रमेश आरटला (१९) हे तिघे जागीच ठार झाले आहेत. तर आॅटोरिक्षातील अन्य ६ जण जखमी झाले़ अपघात घडल्यानंतर कंटनेर चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला.