Filing a cheating case against Shubhakalyan Multistate | शुभकल्याण मल्टीस्टेटच्या विरोधात वाशीत फसवणुकीचा गुन्हा दाखल 

वाशी (उस्मानाबाद ): शुभकल्याण मल्टीस्टेटममध्ये गुंतवणूक केलेल्या चौघांची ३४ लाख ३२ हजार ७२८ रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चेअरमन दिलीप आपेट यांच्यासह ११ संचालकांविरूध्द सोमवारी रात्री वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

कळंब तालुक्यातील शंभुमहादेव साखर कारखान्याचे चेअरमन  दिलीप आपेट यांनी शुभकल्याण मल्टीस्टेटची वाशी येथे शाखा उघडून ठेवीदारांना जास्तीच्या व्याजदराचे आमीष दाखवून लाखो रूपयाच्या ठेवी जमा केल्या. अनेक ठेवीदारांच्या ठेवीची मुदत संपल्यानंतर ठेवीदारानी मल्टीस्टेटचे दरवाजे झिजवण्यास प्रारंभ केला मात्र, त्यांना परतावा मिळत नव्हता. यातच गत काही महिन्यापासून शहरातील लक्ष्मीरोडवरील शुभकल्याण मल्टीस्टेटला सतत टाळे दिसत असल्यामुळे ठेवीदारांमध्ये अस्वस्थता पसरली.

मुदत संपूनही ठेवीचे पैसे परत मिळत नाही असे दिसताच सेवानिवृत्त कर्मचारी अशोक उत्तमराव कवडे यांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या रक्कमेतून जवळपास साडेतीन लाख रूपयाची गुंतवणूक त्यांनी केली होती. यासह तालुक्यातील इतर चौघांची ३४ लाख ३२ हजार ७२८ रूपये रक्कम शुभकल्याण मल्टीस्टेटमध्ये अडकून पडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कवडे यांच्या फिर्यादीवरून चेअरमन आपेट यांच्यासह ११ जणांविरूध्द वाशी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोनि दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि अशोक पिंपळे हे करत आहेत.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.