उस्मानाबाद : तेर येथील एका अल्पवयीन दिव्यांग मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी आज सकाळी गाव बंद ठेवून मूक मोर्चा काढला. यावेळी ग्रामस्थांनी पिडीतेला जलद  न्याय मिळावा अशी मागणी पोलिस प्रशासनाकडे एका निवेदना मार्फत केली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या निवेदनानुसार, अत्याचारग्रस्त मुलगी हि अल्पवयीन असून गतीमंद आहे. अत्याचारामुळे ती गरोदर राहिली आहे. मात्र, या घटनेनंतर अत्याचार करणा-या आरोपीने बदनामीपोटी आत्महत्या केली आहे. यावेळी पोलिसांनी  त्याच्या आत्महत्येस जबाबदार धरून मुलीच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचार झालेल्या मुलीची आई अंध आहे़ तर वडिल मजुरी करतात. 

यामुळे पिडीतेला जलद न्याय द्यावा, तिच्यासह कुटुंबाचे पुर्नवसन करावे, या मागणीसाठी शुक्रवारी तेर गाव बंद ठेवून हा मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर ढोकी ठाण्याचे सपोनि किशोर मानभाव यांच्या मार्फत पोलीस अधीक्षकांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते़