उस्मानाबादेत खाते शून्यात; जागा पदरी पाडून घेण्यासाठी भाजपचे ‘मिशन अ‍ॅडमिशन’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 03:14 AM2019-07-21T03:14:39+5:302019-07-21T06:16:48+5:30

काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर जागा टिकविण्याचे आव्हान

BJP's 'Mission Admissions' | उस्मानाबादेत खाते शून्यात; जागा पदरी पाडून घेण्यासाठी भाजपचे ‘मिशन अ‍ॅडमिशन’

उस्मानाबादेत खाते शून्यात; जागा पदरी पाडून घेण्यासाठी भाजपचे ‘मिशन अ‍ॅडमिशन’

googlenewsNext

चेतन धनुरे

उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप-सेनेतील ‘तू तू-मैं मैं’ पाहून हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढतील, असे चित्र उभे केले गेले होते़ त्यातच मोदींचा करिष्मा कायम राहिल्याने जिल्ह्यात अनेक इच्छुकांनी आगामी विधानसभा नजरेसमोर ठेऊन भाजपात प्रवेश केला आहे़ हा ओघ अजूनही कायम आहे़ त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या जिल्ह्यातील भाजपमधून आता उघड-उघड स्वबळाची हाक दिली जात आहे़ असे असले तरी निवडणुकीपूर्वी मित्रपक्ष सेनेकडून तुळजापूरची जागा कायम राखत आणखी एक वाढीव जागा पदरी पाडून घेण्यासाठी हे दबावतंत्र वापरले जात असल्याचे स्पष्ट आहे़

पाच वर्षांपूर्वीपर्यंत जिल्ह्यात भाजपचे स्थान नगण्य होते़ युतीत चारही मतदारसंघ हे शिवसेनेच्या वाट्याचे़ २००९ ला एकमेव तुळजापूर भाजपच्या वाट्याला आला आहे़ येथून भाजपचा एकही आमदार विधानसभेत गेला नाही़ हे चित्र बदलण्यासाठी भाजपने सुजितसिंह ठाकूर यांच्या माध्यमातून विधानपरिषद सदस्य दिला़ यानंतर हळुहळु जिल्ह्यात पाय पसरण्यास सुरुवात केली़ आजघडीला सर्वाधिक प्रवेश हे भाजपात होत आहेत़ त्यामुळे साहजिकच भाजपचे बळ वाढले आहे़ याच बळावर भाजपने स्वबळाचीही तयारी ठेवली आहे़ याबाबत आता जाहीर विधानेही केली जावू लागली आहेत़ विधानसभेसाठी सर्वाधिक इच्छुक हे भाजपकडे आहेत़ तर दुसरीकडे मित्रपक्ष शिवसेनेतही उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच आहे़ भाजप-सेनेतील संभाव्य बंडखोरी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडतील, असे आजचे चित्र असले
तरी भाजप-सेनेला बंडखोरी टाळण्यात यश आल्यास मात्र, वाट खडतर असणार आहे़

उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे़ तर सेनेतून नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, खासदारांचे भाऊ जयराज राजेनिंबाळकर, सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे यांची नावे चर्चेत आहेत़ स्वतंत्र लढल्यास भाजपातून नितीन काळे, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, सुरेश पाटील, डॉ़ प्रतापसिंह पाटील यांच्या नावाची चर्चा आहे़ परंडा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राहूल मोटे हेच पुन्हा उमेदवार असतील़ त्यांच्याविरोधात लढण्यासाठी सेनेकडून जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्यासह माजी आ़ ज्ञानेश्वर पाटील, सहसंपर्कप्रमुख शंकर बोरकर, सुरेश कांबळे इच्छुक आहेत़ भाजपातून संजय गाढवे तर रासपकडून बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकरांची इच्छा आहे़

तुळजापुरात काँग्रेसचे विद्यमान आमदार मधुकरराव चव्हाण पुन्हा इच्छुक आहेत़ मात्र, यावेळी माजी जि़प़ अध्यक्ष धीरज पाटील यांनीही दावा ठोकला आहे़ अनिल लबडे यांनीही मागणी केली आहे़ सध्या राष्ट्रवादीत असलेले अशोक जगदाळे, जि़प़ गटनेते महेंद्र धुरगुडे यांनीही तयारी केली आहे़ तर भाजपकडून इच्छुकांची मोठी यादी झाली आहे़ देवानंद रोचकरी, सत्यवान सुरवसे, अ‍ॅड़ व्यंकटराव गुंड, रोहन देशमुख, अनिल काळे अशी यादी आहे़ सर्वच पक्षांत येथे बंडखोरी अटळ दिसत आहे़

उमरग्यात विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांची उमेदवारी निश्चित मानली जाते़ काँग्रेसकडून येथे तगडा उमेदवार दिला गेला नाही़ त्यामुळे चौगुलेंचा मार्ग सुकर होत गेला़ आता यावेळी काँग्रेसमधून इच्छुकांची संख्या जास्त असली तरी नेमकी उमेदवारी कोणाच्या पदरात पडेल, हे निश्चित नाही़

गत निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार - शिवसेना २। काँग्रेस १। राष्ट्रवादी १

सध्याचे पक्षीय बलाबल - राष्ट्रवादी काँग्रेस २ । काँग्रेस १ । शिवसेना १़

सर्वात मोठा विजय: तुळजापूर : मधुकरराव चव्हाण (काँग्रेस) २९,६१० (पराभव : जीवनराव गोरे, राष्ट्रवादी)

सर्वात कमी मताधिक्याने पराभव : उस्मानाबाद : ओमप्रकाश राजेनिंबाळकर (शिवसेना) १०,८०६़
(विजयी : राणाजगजितसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस)

Web Title: BJP's 'Mission Admissions'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.