ठळक मुद्दे* ख्रिसमसच्या दिवसांत गोवा फिरण्याची मजा काही औरच असते. गोव्यात अगदी जगप्रसिद्ध असे चर्च आहेत, ज्या ठिकाणी अगदी पारंपरिक पद्धतीनं ख्रिसमस साजरा होतो.* फ्रेचांची वसाहत असलेलं पुदुच्चेरी मुळातच निसर्गसौदयार्नं नटलेलं आहे. इथल्या नितांतसुंदर समुद्र किना-यावर ख्रिसमसच्या सुट्टीचा आनंद तुम्हाला एक अनोखी मनशांती देतो.* मुंबईसाठी जे फोर्टचं स्थान आहे, ते दिल्लीकरांसाठी कनॉट प्लेसचं आहे. ख्रिसमसच्या दिवसांत एक वेगळीच रौनक कनॉट प्लेसमध्ये पाहायला मिळते.
-अमृता कदम


नवीन वषार्चं स्वागत आणि ख्रिसमसची सुट्टी हा योग यामुळे या दिवसांत सहलीचं प्लॅनिंग होतंच. ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशन करण्यासाठी प्रत्येकाचे आपापले प्लॅन असतात. पण ख्रिसमस पाटी आणि नवीन वर्षाची मजा दुप्पट करायची असेल तर काही खास ठिकाणांची माहिती करुन घ्या. ख्रिसमसची मजा केवळ विदेशातच नव्हे तर देशातही अनेक ठिकाणी पाहायला मिळते. त्यातही या पाच ठिकाणांवरचा माहौल हा अगदी बघण्यासारखा असतो.

गोवा

ख्रिसमस आणि गोवा हे जणू समीकरणच बनलंय. ख्रिसमसचं नाव काढलं की भारतात कुणालाही याच शहराचं नाव आठवतं. या दिवसांत गोव्यातल्या गल्ल्या रोषणाई आणि फुलांच्या आकर्षक सजावटींनी फुलून गेलेल्या असतात. त्यामुळे या दिवसांत गोवा फिरण्याची मजा काही औरच असते. गोव्यात अगदी जगप्रसिद्ध असे चर्च आहेत, ज्या ठिकाणी अगदी पारंपरिक पद्धतीनं ख्रिसमस साजरा होतो. शिवाय गोव्याची ओळख असलेल्या लेट नाईट पार्टीज, लाइव्ह म्युझिक पार्टी या तुमच्या ट्रिपचा आनंद आणखी वाढवतात.

 

केरळ

भारतात ज्या आणखी एका ठिकाणी ख्रिश्चन समाजाची संख्या लक्षणीय आहे त्यात केरळचं नाव समाविष्ट होतं. एरव्हीही पर्यटकांचं हे आवडतं राज्य आहेच. पण ख्रिसमस इथे अतिशय उत्साहात साजरा होत असल्यानं या दिवसांत केरळ काहीसं वेगळं भासतं. इथल्या रस्त्यारस्त्यांवर तुम्हाला ख्रिसमसची धूम पाहायला मिळते.

मुंबई

मुंबई हे देशातलं ख-या अथार्नं कॉस्मोपोलिटन शहर. त्यामुळे इथे प्रत्येक धर्मियांचा सण अनोख्या पद्धतीनं साजरा होत असतो. मुंबईचा गणपती उत्सव, माहीमच्या दर्ग्याचा उत्सव जितक्या थाटात होतो तितक्याच थाटात इथे ख्रिसमसही साजरा होतो. ख्रिसमसच्या दिवसांत बेकरीमध्ये ख्रिसमस स्पेशल पेस्ट्री केक, मफिन मुंबईतच मिळू शकतात. केवळ बेकरीच नव्हे तर मुंबईची शाँपिंगही ख्रिसमसच्या दिवसांत खास ठरते.

पुदुच्चेरी

फ्रेचांची वसाहत असलेलं पुदुच्चेरी मुळातच निसर्गसौदयार्नं नटलेलं आहे. इथल्या नितांतसुंदर समुद्र किना-यावर ख्रिसमसच्या सुट्टीचा आनंद तुम्हाला एक अनोखी मनशांती देऊन जाईल. त्यामुळे ख्रिसमसचा उत्साह आणि उल्हास अनुभवता येतो. शांती आणि सेलिब्रेशन याचा अतिशय सुंदर संगम असलेलं हे ठिकाण ख्रिसमसच्या सुट्टीसाठी पर्यटकांच्या हिट लिस्टवर असतं.

 

कनॉट प्लेस, दिल्ली

मुंबईसाठी जे फोर्टचं स्थान आहे, ते दिल्लीकरांसाठी कनॉट प्लेसचं आहे. ख्रिसमसच्या दिवसांत एक वेगळीच रौनक कनॉट प्लेसमध्ये पाहायला मिळते. जर तुम्ही पार्टीच्या मूडमध्ये असाल तर इथे तुम्हाला एकाहून एक असे सरस पर्याय उपलब्ध आहेत. अनेक प्रकारचे बार आणि रेस्टॉरण्ट ख्रिसमसच्या वेळी विविध उपक्रमांचंही आयोजन करत असतात.
त्यामुळे ख्रिसमसला जोडून येणा-या सुटीचा आनंद ख-या अर्थानं लुटण्यासाठी यापैकी एका ठिकाणाची निवड करायला हरकत नाही.