गोवा प्लॅन करा अगदी कमी खर्चात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 04:01 AM2018-04-17T04:01:49+5:302018-04-17T04:02:07+5:30

निळाशार समुद्र, फेसाळणाऱ्या शुभ्र लाटा, रुपेरी वाळू आणि हातात प्रेयसीचा हात... काय, आठवला ना गोवा? जीवनात एकदा तरी गोव्याला जावे, अशी भारतातल्या प्रत्येक तरुणाची इच्छा असते.

 Plan Goa at a very low cost | गोवा प्लॅन करा अगदी कमी खर्चात

गोवा प्लॅन करा अगदी कमी खर्चात

googlenewsNext

- सुहास शेलार

निळाशार समुद्र, फेसाळणाऱ्या शुभ्र लाटा, रुपेरी वाळू आणि हातात प्रेयसीचा हात... काय, आठवला ना गोवा? जीवनात एकदा तरी गोव्याला जावे, अशी भारतातल्या प्रत्येक तरुणाची इच्छा असते. त्यासाठी फार आधीपासूनच प्लॅनिंग ठरते. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर ग्रुप तयार होतात. त्यावर रात्रंदिवस चर्चा चालतात. पण ऐनवेळेस ठरलेला प्लॅन मोडतो, तो बजेटमुळे. पण आम्ही तुमच्यासाठी अशा काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्या वापरून तुम्ही कमी खर्चात गोवा फिरू शकता.


(Image Credit : thetimes.co.uk)

गोव्यात सर्वात जास्त खर्च होतो तो राहण्याचा. इथल्या छोट्या-छोट्या हॉटेलमधील रूमदेखील सर्वसामान्यांना न परवडण्याजोग्या असतात. पण तुम्ही थोडीशी शक्कल लढवा आणि आॅनलाइन हॉटेल बुकिंगचा पर्याय निवडा. यात तुम्हाला ३०० ते १००० रुपयांत रूम मिळून जाईल. अर्थात हे बुकिंग १५ ते २० दिवस आधी करणे अपेक्षित आहे. रूमचे बुकिंग करण्याआधी तुम्ही कोणकोणती ठिकाणे फिरणार आहात, त्याचे पूर्वनियोजन करा आणि त्यानुसार राहण्याचे मध्यवर्ती ठिकाण निवडा. जेणेकरून अतिरिक्त प्रवास खर्च टळेल.

(Image Credit : Cleartrip)

गोव्यातल्या टॅक्सी किंवा आॅटोरिक्षाचा प्रवास मुंबईच्या तुलनेत जवळपास पाचपट महाग आहे. दोन किलोमीटरच्या प्रवासासाठी येथे ५० रुपये घेतात. कारण येथे ना मीटर सक्ती, ना प्रवासासाठी ठरलेले दर आहेत. नवखा प्रवासी दिसला की रिक्षा-टॅक्सीचालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात. त्यामुळे तुम्ही सार्वजनिक किंवा खासगी बस प्रवास निवडा. महत्त्वाच्या पर्यटनस्थळांपर्यंत जाण्यासाठी गोव्यात खासगी बस सेवा दर मिनिटाला उपलब्ध असते. शिवाय गुगल मॅपचा आधार घेतल्यास आपल्याला टुरिस्ट गाइडचीही आवश्यकता भासणार नाही.


(Image Credit : saga.co.uk)

गोव्यात फिरताना माश्याच्या कालवणाचा घमघमाट, तळलेल्या मासळीचा खमंग वास नाकात गेला की, तोंडाला आवर घालता येत नाही. पण इथल्या जेवणाचे रेट्स इतके महाग आहेत, की बरेच जण पाट्या वाचूनच बाहेर पडतात. येथे साधी इस्वण (सुरमई) थाली खायची झाल्यास ३०० रुपये मोजावे लागतात. पण घाबरू नका... कमी रेट्सवाली हॉटेल्सही गोव्यात आहेत. पण ती किनाऱ्यापासून दूर.

तुम्हाला कमी पैशात गोव्यातील माश्यांची चव चाखायची असल्यास शहरात या. येथे एकापेक्षा एक सरस चविष्ट जेवण देणारी हॉटेल्स आहेत. येथे तुम्हाला सुरमई थाली १०० ते १५० रुपयांत मिळेल.

मित्रांनो, अशा छोट्या छोट्या गोष्टींचे ‘परफेक्ट प्लॅनिंग’ केल्यास तीन दिवसांची गोवा पिकनिक अवघ्या अडीच ते तीन हजारांत होऊ शकते. त्यामुळे आता नुसत्या ग्रुपवरच्या चर्चा थांबवा आणि प्रत्यक्षात गोवा प्लॅन करा... तेही कमी बजेटमध्ये.


(Image Credit : Cleartrip)
 

इथे भेट द्याच

उत्तर गोवा - कळंगुट, बागा, शिकेरी, मिरामार, दोनापावल, हणजुण, हरमल, वागातोर, मांद्रे, मोरजी आदी समुद्रकिनारे. तसेच पणजीतील आदिलशाहचा राजवाडा, अवर लेडी इमॅक्युलेट चर्च, मंगेशी मंदिर, शापोरा किल्ला, शिकेरी किल्ला आदी पर्यटनस्थळे.

दक्षीण गोवा - कोलवा, बाणावली, बोगमाळो, वार्का, माजोर्डा, कोळंब आदी समुद्रकिनारे, तसेच लोटली येथील पोर्तुगीजकालीन चर्चला भेटी देणाºया पर्यटकांची संख्या जास्त आहे.

Web Title:  Plan Goa at a very low cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा