ठामपामध्ये तब्बल १ हजारहून अधिक वृक्षतोडीचे प्रस्ताव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 06:28 AM2017-10-19T06:28:39+5:302017-10-19T06:28:52+5:30

More than 1 thousand trees of trees are approved in Thampa | ठामपामध्ये तब्बल १ हजारहून अधिक वृक्षतोडीचे प्रस्ताव मंजूर

ठामपामध्ये तब्बल १ हजारहून अधिक वृक्षतोडीचे प्रस्ताव मंजूर

googlenewsNext

 ठाणे : वृक्ष प्राधिकरण समितीचा कित्ता नव्या समितीनेदेखील गिरवला आहे. पहिल्याच बैठकीत या समितीने तब्बल १ हजारहून अधिक वृक्षतोडीचे प्रस्ताव मंजूर करून बिल्डरधार्जिन्या धोरणाला जणू पुन्हा पाठिंबाच दिल्याचे दिसून आले आहे.

काही महिने वादग्रस्त ठरत असलेली वृक्ष प्राधिकरण समिती अखेर गठीत झाली आहे. तिची पहिलीच बैठक मंगळवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीच्या विषयपटलावर महापालिकेच्या विविध प्रकल्पांमध्ये बाधित होत असलेले ४२५ वृक्ष, तर बांधकाम व्यावसायिकांच्या विकास प्रस्तावांमध्ये बाधित होत असलेले एक हजार ९० वृक्ष तोडण्याचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवले होते. त्यामध्ये २२८ वृक्ष हे सुबाभूळ जातीचे आहेत. या सर्व प्रस्तावांना समितीने मान्यता दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच बांधकाम व्यावसायिकांच्या विकास प्रस्तावामध्ये वृक्षांचा ठरलेला अडथळाही समितीने दूर केल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. महापालिकेच्या विविध प्रकल्पांमध्ये आणि बांधकाम व्यावसायिकांच्या विकास प्रस्तावामध्ये बाधित होणारे वृक्ष तोडण्यात येणार असले, तरी त्या बदल्यात १६ हजार ३५० वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. तसेच पुनर्राेपण करण्यात येणाºया १६६२ वृक्षतोडीच्या बदल्यात संबंधित विकासकांकडून एकूण ८ हजार ३१० वृक्षलागवडीसह शहरात एकूण २५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. असे असले तरी वृक्षतोडीच्या बदल्यात संबंधित बांधकाम व्यावसायिकांकडून समितीच्या धोरणाप्रमाणे वृक्षलागवड करण्यात येईल का आणि वृक्ष प्राधिकरण समितीकडून खरोखरच त्यांची पाहणी केली जाईल का, असे सवाल आता शहरातून उपस्थित केले जात आहेत.
वृक्ष प्राधिकरण समितीचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख आणि सुलभ होण्यासाठी महापालिका आयुक्त व प्राधिकरणाचे अध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी विविध समित्यांची स्थापना केली आहे. यामध्ये न्यायालयीन पातळीवरील होणाºया निर्णयांचा अभ्यास करून त्याआधारे धोरण ठरवण्यासाठी चंद्रहास तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली, तर प्रस्तावांना मंजुरी देण्याच्या अटी आणि शर्तींबाबत अभ्यास करण्यासाठी संतोष तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे.
तसेच वृक्षवल्ली प्रदर्शनाचे सुयोग्य पद्धतीने आयोजन करण्यासाठी पाच सदस्यांची समिती गठीत करण्यात आली. यंदा १३ ते १५ जानेवारीला हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

 

 

Web Title: More than 1 thousand trees of trees are approved in Thampa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे