आला पावसाळा... चला सहलीला...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 06:53 PM2019-06-18T18:53:41+5:302019-06-18T18:54:09+5:30

पावसाळा सुरू होताच तरुणाईला वेध लागतात ते सहलींचे. यंदा ‘वायू’ चक्रीवादळामुळे पाऊस काहीसा लांबला आहे. सध्या मान्सूनपूर्व पाऊस पडत असला, तरी तरुणाईने पावसाळी सहलींसाठी बेत आखण्यास सुरुवात केली आहे.

Monsoon Special Visit these places for monsoon trip | आला पावसाळा... चला सहलीला...

आला पावसाळा... चला सहलीला...

Next

पद्मजा जांगडे

पावसाळा सुरू होताच तरुणाईला वेध लागतात ते सहलींचे. यंदा ‘वायू’ चक्रीवादळामुळे पाऊस काहीसा लांबला आहे. सध्या मान्सूनपूर्व पाऊस पडत असला, तरी तरुणाईने पावसाळी सहलींसाठी बेत आखण्यास सुरुवात केली आहे. वैविध्यपूर्ण निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सह्याद्रीच्या रांगा, कळसुबाईचे शिखर, गडकिल्ले, कोकणातील समुद्र किनारे पर्यटकांना नेहमीच साद घालतात. मात्र, वन-डे पिकनिकसाठी ही ठिकाणे वाहतुकीच्या दृष्टीने सोयीची नाहीत. जाण्या-येण्यात अधिक वेळ जातो, शिवाय दमछाकही होते. त्यामुळे मुंबईपासून हाकेच्या अंतरावरील पिकनिक स्पॉटचा शोध सुरू झाला आहे. पावसाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकणाऱ्या खालील स्थळांना यंदाच्या पावसाळ्यात नक्कीच भेट द्या...

कर्नाळा -पनवेल

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पनवेलजवळ असलेला ऐतिहासिक कर्नाळा किल्ला नेहमीच पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. येथील पक्षी अभयारण्यात पावसाळ्यात विविध जाती-प्रजातीचे पक्षी पाहायला मिळतात. ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांना किल्ल्यावरील भटकंती, मोहीम फत्ते केल्याचा आनंद देऊ शकते. या ठिकाणी असलेले लहानमोठे धबधबे, कर्नाळा तलावात भिजण्यासाठी सुरक्षित मानले जातात. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कर्नाळ्यात तुम्ही बाय रोड पोहोचू शकता. नाहीतर पनवेल रेल्वे स्थानकात उतरून बस किंवा रिक्षाने अवघ्या काही मिनिटांत कर्नाळा पक्षी अभयारण्यात दाखल होऊ शकता. पनवेल परिसरातील आदईतील धबधबा, छोटे मोर्बे धरण, नेरेतील धबधब्यावरही पर्यटक आवर्जून भेट देतात.

पळसदरी-खोपोली

खोपोली रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला पळसदरी धबधबा पावसाळ्यात नेहमीच पर्यटकांना खुणावतो. डोंगरातील कडे-कपारीतून कोसळणारे पाणी, आजूबाजूला हिरवाईने नटलेला परिसर मनात नवी ऊर्जा निर्माण करतो. जवळच सोनगिरी किल्ला असून, पावसाळी सहल आणि ट्रेकिंगसाठी दरवर्षी या ठिकाणी हजारो पर्यटक येतात.

माळशेज घाट-मुरबाड

कल्याण-मुरबाड मार्गावरील माळशेज घाट जितका अवघड तितकाच आकर्षक. चहूबाजूंनी हिरवा गालिचा पांघरलेल्या या घाटातील धबधबे पर्यटकांना नेहमीच भुरळ घातलात. त्यामुळे पावसाळ्यात घाटमाथ्याचा परिसर पर्यटकांनी फुलून जातो. जेवणाची, राहण्याचीही परिसरात उत्तम सोय होत असल्याने मित्रमैत्रिणी, कार्यालयीन सहकारी, कुटुंबासह या ठिकाणी सहलीला येण्याला पसंती दिली जाते. एकीकडे खोल दरी तर दुसरीकडे डोंगर असल्याने या ठिकाणी अनेकदा वाहतूककोंडी उद्भवते, शिवाय दरड कोसळण्याचे प्रकारही होत असतात. त्यामुळे सुरक्षित प्रवास करीत उत्साहावर नियंत्रण ठेवल्यास माळशेज घाटातील सहल साहसी, अविस्मरणीय ठरू शकते.

भिवपुरी-कर्जत

मध्य रेल्वे मार्गावर कर्जत ट्रेन पकडल्यास भिवपुरी स्थानकात उतरून धबधब्याकडे जाता येते. माथेरानच्या डोंगरातील पाणी ज्या ठिकाणी कोसळते, तोच हा भिवपुरी धबधबा. शेतातून जाणाऱ्या पाऊलवाटेने धबधब्यापर्यंत पोहोचेपर्यंत निसर्गाची अनेक रूपे या ठिकाणी पाहायला मिळतात. पावसाळी सहलीसाठी सुरक्षित म्हणून या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येतात, शिवाय घरगुती पद्धतीचे उत्तम जेवण मिळत असल्याने पोटपूजेचाही प्रश्न मिटतो.

कोंडेश्वर-बदलापूर

बदलापूर रेल्वे स्थानकापासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेला कोंडेश्वर धबधबा मुंबई-ठाणेकरांसाठी आवडते ठिकाण आहे. या ठिकाणी पोहोचण्यासाठी रेल्वे स्थानकातून टमटम मिळतात. पंधरा फुटांवरून कोसळणाऱ्या धबधब्याखाली भिजण्याचा मोह कुणालाही आवरता येत नाही. शंकराचे प्राचीन मंदिर असल्याने परिसरात कोंडेश्वर नाव पडले आहे. पावसाळ्यातच नव्हे, तर इतर वेळीही या ठिकाणी भेट देणाऱ्यांची संख्या मोठी असते.

कोर्लई, कुलाबा-अलिबाग

विस्तीर्ण समुद्र किनारा, नारळी-पोकळीच्या बागा आणि सुरुच्या वनांमुळे वन-डे पिकनिकसाठी उत्तम पर्यटनस्थळ म्हणून अलिबाग नेहमीच पसंतीस उतरते. येथील समुद्र किनाऱ्याबरोबरच कोर्लई किल्ला, कुलाबा किल्ला, कनकेश्वरची जंगल सफारीही नवा अनुभव देऊन जाते. स्वच्छतागृह, चेंजिंग रूमची सोय, कॉटेज, फार्म हाउस भाड्याने मिळत असून, घरगुती पद्धतीचे उत्तम जेवण उपलब्ध होत असल्याने कौटुंबिक सहलीसाठी येणाऱ्यांची संख्या अधिक असते.

जुम्मापट्टी-माथेरान

थंड हवेचे ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये वर्षभर लाखो पर्यटकांची वर्दळ असते. मात्र, जुम्मापट्टी येथील धबधबा पावसाळी पर्यटनासाठी विशेष ओळखला जातो. मिनीट्रेनच्या मार्गावर असले, तरी पायी अवघ्या काही मिनिटांत धबधब्यावर पोहोचता येते. ट्रेकिंग, निसर्ग पर्यटनाची आवड आणि रानमेव्याचे खवय्ये असणाºयांनी पावसाळ्यात या ठिकाणी आवर्जून भेट द्यावी. येथून जवळच असलेल्या इको पॉइंटवरून सह्याद्रीच्या रांगा नजरेस पडतात, तर पॅनोरमा पॉइंटवरून पश्चिम घाटातील नैसर्गिक संपदेचे दर्शन घडते.

भुशी डॅम-लोणावळा

मुंबई पुणे महामार्गावर वसलेल्या लोणावळ्यातील वातावरण वर्षभर आल्हाददायक, मन प्रसन्न करणारे असते. पावसाळ्यात तर निसर्ग आणखीनच खुलतो. शांत, रम्य परिसरातील धबधबे, लेण्याची सफर म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच ठरते. भुशी डॅम, कार्ल्याची लेणी, भाजा लेणी, लोणावळा तलाव, पावना तलाव ही ठिकाणे पावसाळी सहलींसाठी सुरक्षित मानली जातात. मुंबई-गोवा जुन्या मार्गावरून जातात, अनेक लहान-मोठे धबधबे पर्यटकांना भुरळ घातलात. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आणि सुरक्षित विचार करून पर्यटक स्वत:च नवनवीन धबधब्यांचा शोध घेताना दिसतात.

Web Title: Monsoon Special Visit these places for monsoon trip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.