ठळक मुद्दे* ब्रिटीशांच्या काळात काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी सेल्यूलर जेल प्रसिद्ध होता. या ठिकाणाची पर्यटकांना व्यवस्थित माहिती व्हावी, तुरूंग नीट पाहता यावी यासाठी अनेक सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. इथेच सावरकरांचा पुतळाही बसवण्यात आला आहे.* डच लोकांनी च राजमुद्रीतल्या किल्ल्याची निर्मिती केली होती. 1870 मध्ये या किल्ल्याचं रूपांतर राजमुद्री जेलमध्ये करण्यात आलं.* पश्चिम बंगालमधल्या अलीपोर जेलची निर्मिती ब्रिटीशकाळात झालेली होती. या तुरूंगाचं एक वैशिष्टय म्हणजे या ठिकाणी जुन्या काळात वापरली जाणारी अनेक शस्त्रं ठेवण्यात आलेली आहेत.
- अमृता कदम


काही ठिकाणं अशी असतात ज्याबद्दल आपल्या मनात आधीच काही गृहीतकं बनलेली असतात. त्यामुळे तुरूंग असा शब्द उच्चारल्यावर आपल्या मनात नकारात्मकच भाव यायला लागतात. डोक्यात गुन्हेगारी वर्तुळाशी संबंधित काहीतरी घुमायला लागतं. त्यामुळे तुरूंग  आणि पयर्टन हे शब्द एकत्र उच्चारल्यावर अनेकांच्या भुवया उंचावतील. पण भारतात काही तुरूंग असे आहेत ज्यांच्यासोबत शतकांचा इतिहास जोडला गेलेला आहे. देशातल्या अनेक थोर व्यक्तींनी या तुरूंगात काळ व्यतीत केलेला आहे, अगदी ग्रंथही लिहिले आहेत. त्यांच्यामुळे या तुरूंगांना एक विशिष्ट वलय प्राप्त झालं आहे आणि अशा तुरूंगांना भेट देण्यासाठी पर्यटकांचा ओढा वाढत चालला आहे.

सेल्यूलर जेल, अंदमान

अंदमानच्या तुरूंगाबद्दल किमान मराठी माणसाला तरी नव्यानं सांगण्याची गरज नाही. सावरकरांच्या विचारांची आपल्याकडे दोन राष्ट्रीय पक्षांत टोकाची विभागणी झालेली असली तरी त्यांच्या राष्ट्रप्रेमाबद्दल मात्र शंका घ्यायचं कारण नाही. अंदमान निकोबार बेटाची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअर या ठिकाणी हा तुरूंग आहे. ब्रिटीशांच्या काळात काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी हा तुरूंग  प्रसिद्ध होता. या ठिकाणाची पर्यटकांना व्यवस्थित माहिती व्हावी, तुरूंग नीट पाहता यावी यासाठी अनेक सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. इथेच सावरकरांचा पुतळाही बसवण्यात आला आहे. जिथे सावरकरांनी नरकयातना भोगल्या आहेत, तो तुरूंग पाहताना आजही मन हेलावून जाते.

 


 

राजमुद्री जेल, आंध्र

भारतातल्या या भागात डच लोकांची वसाहत होती. त्यांनीच राजमुद्रीतल्या किल्ल्याची निर्मिती केली होती. 1870 मध्ये या किल्ल्याचं रूपांतर तुरूंगात करण्यात आलं. आज या ठिकाणी अनेक पर्यटक ऐतिहासिक स्थळ म्हणून भेट देण्यासाठी येत असतात.

 


 

हिजली जेल
बंगालच्या मिदनापूर जिल्ह्यात हा तुरूंग आहे. स्वातंत्र्यांच्या आंदोलनात या ठिकाणी दोन नि:शस्त्र क्रांतीकारकांची हत्या करण्यात आली होती. ज्यावर रवींद्रनाथ टागोर आणि सुभाषचंद्र बोस यांनी आवाज उठवला होता. आज या तुरूंगात टागोर आणि बोस या दोघांच्याही प्रतिमा आहेत. ऐतिहासिक महत्व असलेल्या या किल्ल्यात स्वातंत्र्य चळवळीत बंगालच्या योगदानाचीही झलक पाहायला मिळते.

 


 

वाइपर आइसलॅण्ड

अंदमान निकोबार बेटांवर वसलेला हा आणखी एक तुरूंग. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतल्या अनेक क्रांतीकारकांना या ठिकाणी डांबण्यात आलेलं होतं. या क्रांतीकारकांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठीही अनेक पर्यटक इथे येत असतात.


 

अलीपोर जेल

पश्चिम बंगालमधल्या या तुरूंगाची निर्मिती ब्रिटीशकाळात झालेली होती. या तुरूंगाचं एक वैशिष्टय म्हणजे या ठिकाणी जुन्या काळात वापरली जाणारी अनेक शस्त्रं ठेवण्यात आलेली आहेत. जेलसोबतच या जुन्या शस्त्रांची सफर तुमच्या ज्ञानात आणखी भर टाकणारी होते.
स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचा काळ अनुभवण्यासाठी एकदा तरी या तुरूंगाची वारी करायला हवी. आणि हो इथे जाण्यासाठी हातात बेड्या पडण्याचीही गरज नाही!