विमान प्रवासात सन्मान द्या आणि आनंद घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क on Thu, November 09, 2017 6:43pm

फ्लाइट अटेन्डन्टशी नीट सहकार्यानं आणि शिष्टाचारानं वागून तुम्ही तुमचा विमान प्रवास अधिक सुखकारक बनवू शकता. ‘जेटब्ल्यू ’या आंतरराष्ट्रीय विमानकंपनीत फ्लाइट अटेन्डन्ट असलेल्या अमान्डा प्लेवा हिनं त्यासाठी काय करायला हवं यावर एक सविस्तर ब्लॉगच लिहिला आहे.

- अमृता कदम वेळेची बचत आणि आरामदायी प्रवास यामुळे आजकाल विमानप्रवासालाच पसंती दिली जाते. विमानप्रवासात हवाई सुंदरींकडून मिळणारी अदबशीर वागणूक हे विमानप्रवासातल्या कम्फर्टचं एक महत्त्वाचं कारण. प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी आणि आपल्या विमानकंपनीचा नावलौकिक जपण्यासाठी या फ्लाइट अटेन्डन्ट नेहमीच खूप मेहनत घेत असतात. बहुधा त्यामुळेच अनेक जण त्यांना गृहीत धरतात आणि त्यांनी आपली अगदीच ताबेदारीच करावी अशी अपेक्षा ठेवतात. पण तसं न करता फ्लाइट अटेन्डन्टशी नीट सहकार्यानं आणि शिष्टाचारानं वागून तुम्ही तुमचा प्रवास अधिक सुखकारक बनवू शकता. ‘जेटब्ल्यू ’या आंतरराष्ट्रीय विमानकंपनीत फ्लाइट अटेन्डन्ट असलेल्या अमान्डा प्लेवा हिनं त्यासाठी काय करायला हवं यावर एक सविस्तर ब्लॉगच लिहिला आहे.

 

तिनं आपल्या या पोस्टमध्ये लोकांकडून येणारे उद्धटपणाचे अनुभव आणि इतरही अडचणींबद्दल सविस्तरपणे लिहिलं आहे. ‘माझ्या कामातला सगळ्यांत वाईट भाग कोणता आहे माहितीये? लोकांचं खाणं उचलणं किंवा अत्यंत रागारागानं भांडणा-या प्रवाशाला समजावणं असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. मी दारात उभी राहून लोकांचं स्वागत करतीये आणि माझ्या तोंडाकडेही न बघता माझ्या अभिवादनाकडे सपशेल दुर्लक्ष करु न जेव्हा लोक जातात तेव्हा खूप अपमानास्पद वाटतं.’’ फर्स्ट क्लास आणि बिझनेस क्लासमधल्या लोकांना इकॉनॉमी क्लासमधल्या लोकांपेक्षा जास्त चांगली वागणूक दिली जाते, अशी टीका करणारा एक लेख प्रसिद्ध झाल्यानंतर प्लेवानं हा ब्लॉग लिहिला. फर्स्ट क्लास आणि बिझनेस क्लासमधल्या लोकांना वेगळी ट्रीटमेण्ट मिळते, हे प्लेवानं नाकारलं नाहीये. पण त्याचबरोबर आत येताना आमच्या अभिवादनाला हसून ‘हॅलो’ म्हणून प्रतिसाद देणा-या ब-याचशा प्रवाशांमध्ये फर्स्ट क्लासचेच प्रवासी असतात हेसुद्धा तिनं आवर्जून नमूद केलं आहे. ‘बिझनेस क्लासमधून प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या मुळातच मर्यादित असल्यामुळे त्यांच्यासोबत वैयक्तिक संपर्क ठेवणं सोपं जातं. पण इकॉनॉमी क्लासमध्ये जास्त प्रवासी असल्यामुळे फ्लाइट अटेण्डन्टला त्या प्रत्येकाजवळ जाऊन बोलणं शक्य होत नाही. जेव्हा लोकं अशा बिनचेह-याच्या गर्दीचा भाग नसतात, तेव्हा त्यांचं वागणं वेगळं असतं,’ असंही तिनं आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. इकॉनॉमी क्लासमधल्या सगळ्यांशीच फ्लाइट अटेन्डण्ट संवाद साधू शकत नसल्या तरी प्रवाशांनी थोडासा विनम्रपणा आणि शिष्टाचार दाखवला तर त्यांचं काम सहज होऊन जातं. ‘आमच्या काही लक्षात येत नाही असं तुम्हाला वाटत असेल. पण आम्ही प्रवाशांचं वागणं पाहात असतो. तुम्हाला त्याची पावतीही आमच्या वागण्यातून देतो. कधीमधी एखादं फ्री ड्रिंक, तुम्हाला आरामदायी मोकळ्या सीटवर बसायला देणं किंवा तुम्ही बेल वाजवण्याच्या आतच तुम्हाला काय हवं नको त्याची विचारपूस करणं असं काही ना काही आम्ही करतच असतो. अदबशीर वागणारे विमानप्रवासी फ्लाइट अटेन्डण्टच्या कायम लक्षात राहतातच,’ प्लेवानं ही गोष्ट आवर्जून नमूद केलीये. आणि प्रवाशांनी नेमकं कसं वागायचं याची हिंटही दिली आहे. त्यामुळेच भलेही तुम्ही इकॉनॉमी क्लासनं प्रवास करत असलात तरी बोर्ड करताना फ्लाइट अटेन्डन्टच्या ‘हॅलो’ला स्मितहास्याच्या रूपात प्रत्युत्तर द्यायला विसरु नका.

संबंधित

World Chocolate Day : चॉकलेट क्रेझी असाल तर 'या' 5 देशांना नक्की भेट द्या!
पर्यटकांनो, गोव्यात 'या' 24 असुरक्षित ठिकाणांपासून सावधान! सेल्फी घेण्यास मनाई 
पुण्यातल्या कार्ले, भाजे, बेडसे, घोरावडेश्वर, पाले, पाटण या लेण्या आवर्जून पाहा!
पावसाळ्यात भारतातल्या कोणत्या राज्यांमध्ये फिरायला जाल?....
उन असह्य हाेतंय, तर मग पुण्याजवळील या सात ठिकाणांना जरुर भेट द्या

ट्रॅव्हल कडून आणखी

Monsoon Special : पावसाळ्यात राज्याबाहेरील या ठिकाणांना द्या आवर्जून भेट!
गोव्याला जाऊन या ठिकाणांवर चुकूनही घेऊ नका सेल्फी, पडू शकतं महागात!
‘कोकण कॉन्क्लेव्ह’ ची जोरदार तयारी
विकेन्डला धमाल-मस्ती करण्यासाठी खास वन-डे डेस्टिनेशन!
हे आहे भारतीय सीमेवरील सर्वात शेवटचं गाव, अॅडव्हेंचरचा अनुभव घेण्यासाठी खास डेस्टिनेशन!

आणखी वाचा