Do you know these destination weddings? | हे डेस्टीनेशन वेडिंग्ज तुम्हाला माहिती आहेत का?

ठळक मुद्दे* अभिनेत्री राणी मुखर्जी आणि दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांचा विवाहही इटलीमध्येच संपन्न झालेला होता.* जॉन अब्राहमने आपली खास मैत्रिण प्रिया रुंचाल हिच्यासोबत लॉस एंजेलिसमध्येच विवाह केला.* सेलिना जेटलीनं आॅस्ट्रिया या युरोपियन देशात लग्न केलं.- अमृता कदम

गेले काही दिवस विराट आणि अनुष्काच्या डेस्टिनेशन वेडिंगची चर्चा सर्वत्र होते आहे. जितकी चर्चा त्यांच्या लग्नाची झाली तितकीच त्यांनी लग्नासाठी जे स्थळ निवडलं त्याचीही झाली. इटलीमधल्या एका अत्यंत शांत, खासगी, निसर्गानं नटलेल्या टस्कनी या ठिकाणी त्यांचा विवाहसोहळा पार पडला. केवळ अनुष्कानेच नाही तर इतर बॉलिवूड स्टार्सनेही लग्नासाठी काही खास देश निवडून तिथे लग्न केले होते. हे स्टार्स नेमके कोण आणि त्यांनी लग्नासाठी निवडलेले देश कोणते ही निवड त्यांनी का केली ही माहितीही अतिशय रंजक आहे. अर्थात कोणाला डेस्टिनेशन वेडींग करायचं असेल त्यांच्यासाठी ही माहिती उपयुक्तही ठरेल.

 

माधुरी दीक्षित आणि न्यूयार्क(अमेरिका)

माधुरी दीक्षित हिचं लग्न हा एकेकाळी गाजलेला विषय होता. तिनं एनआरआय नवरा निवडल्यानंतर माध्यमांचा ससेमिरा चुकवत अतिशय साध्या पद्धतीनं हे लग्न अमेरिकेत पार पडलेलं होतं. डॉक्टर नेने हे अमेरिकेतच स्थायिक असल्यानं ‘वरपक्षा’च्या घरालाच लग्नासाठी पसंती देण्यात आली होती.

राणी मुखर्जी आणि इटली

अभिनेत्री राणी मुखर्जी आणि दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांचा विवाहही इटलीमध्येच संपन्न झालेला होता. यशराज बॅनर्सच्या चित्रपटात दिसणा-या बहारदार लोकेशन्सनं चित्रपटसृष्टीत एक नवा ट्रेण्ड  आणला. त्याचाच वारसदार असणा-या आदित्य चोप्राने आपल्या लग्नासाठीही असेच लोकेशन निवडले.

जॉन अब्राहम आणि लॉस एंजेलिस (अमेरिका)

जॉन अब्राहमनं मॉडेल म्हणून चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवलं, तेव्हाच त्यानं हजारो तरु णींच्या हृदयात स्थान मिळवलं होतं. जॉनने आपली खास मैत्रिण प्रिया रुंचाल हिच्यासोबत लॉस एंजेलिसमध्येच विवाह केला.

मनीषा कोईराला आणि काठमांडू
‘नेपाळी ब्युटी’ नावानं प्रसिद्ध असलेली मनीषा कोईराला हिनं अनेक वर्षे चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवलं. मनीषा ही नेपाळच्या राजकीय घराण्याशीही संबंधित आहे. त्यामुळे तिचा विवाह काठमांडूमध्येच अतिशय पारंपरिक पद्धतीनं पण शाही अंदाजात झाला होता.

सेलिना जेटली आणि आॅस्ट्रिया

मॉडेलिंगमधून चित्रपटाकडे वळलेल्या अनेक अभिनेत्रींपैकी एक सेलिना जेटली. अनेक काळ चित्रपटांपासून दूर राहिल्यावर आॅस्ट्रियामध्ये तिनं आपल्या एका मित्रासोबत विवाह केला. आॅस्ट्रिया हा युरोपियन देश प्रसिद्ध आहे, तिथल्या कलात्मक वारशासाठी. या कारणामुळेही सेलिनानं या देशाची निवड विवाहासाठी केली.