हॉटेलमधलं वायफाय वापरताय.. जरा जपून.. इथे धोका आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 06:53 PM2017-08-22T18:53:33+5:302017-08-22T18:58:09+5:30

प्रवासादरम्यान तुम्ही नुकतंच एखाद्या हॉटेलचं वायफाय वापरलं असेल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे.

Avoid use wifi while staying in hotel. | हॉटेलमधलं वायफाय वापरताय.. जरा जपून.. इथे धोका आहे!

हॉटेलमधलं वायफाय वापरताय.. जरा जपून.. इथे धोका आहे!

ठळक मुद्दे* रशिनय गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार युरोपमध्ये सुट्टीसाठी आलेल्या अनेक पर्यटकांना हॅकर्स आपलं लक्ष बनवत आहेत.* सार्वजनिक वायफायमधून तुमच्या स्मार्टफोनमधल्या अनेक संवेदनशील माहितीची पटकन चोरी होण्याची शक्यता असते. एपीटी 28 नावाचा एक ग्रूुप सध्या पाश्चिमात्य देशातल्या अनेक महत्वपूर्ण संस्थांचे पासवर्ड चोरण्याच्या प्रयत्नात आहे.* शक्यतो अनोळखी मेल उघडू नका. मोठी परदेशवारी करून आल्यानंतर आपले पासवर्ड बदलण्याची काळजी घ्या.




- अमृता कदम


हॉटेलच्या पॅकेजमध्ये सध्या फ्री वायफायची सुविधा हा एक कायमचा पर्याय उपलब्ध असतो. कामाची निकड असल्यानं त्याचा वापर आपल्याला आवश्यकच असतो. पण काळजी घेतली नाही तर त्याचे दुष्परिणामही भोगावे लागू शकतात. प्रवासादरम्यान तुम्ही नुकतंच एखाद्या हॉटेलचं वायफाय वापरलं असेल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे.


फ्री वायफाय शक्यतो टाळाच!

हॉटेलमध्ये बॅग टाकली की तातडीनं फ्री वायफायचा उपयोग करायची सवय अनेकांना असते. पण ही सवय तुम्हाला चांगलीच महागात पडू शकते. असेच काही प्रसंग उजेडात आल्यानं सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी याबाबतचे आदेश जाहीर केले आहेत. रशिनय गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार युरोपमध्ये सुट्टीसाठी आलेल्या अनेक पर्यटकांना हॅकर्स आपलं लक्ष बनवत आहेत. जर तुम्ही नुकतीच विदेशवारी केली असेल आणि तिथे मोबाईल किंवा लॅपटॉप वायफाय कनेक्ट केलं असेल तर तुम्हाला तुमचा सगळा डेटा पुन्हा एकदा तपासून पाहण्याची आवश्यकता आहे. जे महत्वाचे पासवर्ड आहेत ते बदलण्याचीही गरज आहे. हॅकर्स तुमचा पैसाअडका तर चोरु शकतातच पण याशिवाय तुमच्या खासगी आयुष्यातल्या अनेक गोष्टी ते सहजपणे माहित करून घेतात. त्याचा ते गैरवापरही करतात.

 



 

 

फ्री वायफायचे धोके

सार्वजनिक वायफायमधून तुमच्या स्मार्टफोनमधल्या अनेक संवेदनशील माहितीची पटकन चोरी होण्याची शक्यता असते. एपीटी 28 नावाचा एक ग्रूुप सध्या पाश्चिमात्य देशातल्या अनेक महत्वपूर्ण संस्थांचे पासवर्ड चोरण्याच्या प्रयत्नात आहे. युरोपातल्या अनेक नामांकित हॉटेल्समध्ये आलेल्या पर्यटकांचा डेटा या ग्रुपनं चोरल्याचं उघड झालंय. जे बिझनेस ट्रॅव्हलर्स वायफाय वापरतात त्यांची गुप्त माहिती पण या हॅकर्सच्या हाती लागलीये.

युरोपातल्या एकूण सात देशातल्या हॉटेल्सना हॅकर्सनं लक्ष केलंय. मध्यपूर्वेच्या एका कंपनीवरही हॅकर्सनं असाच सायबरहल्ला केला होता. हे हॅकर्स रशिया मिलिट्री इंटेलिजन्सशी जोडले असल्याचं वृत्त रशियानं फेटाळलंय.

फायर आय नावाच्या एका सायबर सुरक्षा फर्मच्या दाव्यानुसार ही माहिती हॉटेल्समधल्या काही कर्मचा-याच्या आयडीशी जोडली गेल्याचा प्राथमिक संशय आहे. एपीटी 28 नावाचा एक ग्रूप मेल पहिल्यांदा तुमच्या सिस्टिमवर पाठवला जातो. निष्काळजीपणानं तो उघडला गेला की तो तुमच्या सिस्टीमवर अपलोड होऊन तुमचा डेटा चोरीला जातो.

या घटना विदेशातल्या असल्या तरी आपण भारतातही फ्री वायफायचा वापर करताना सावध असणं गरजेचं आहे. शिवाय परदेशात फिरायला जात असाल तर सावधगिरी बाळगलेली चांगलीच. शक्यतो अनोळखी मेल उघडू नका. मोठी परदेशवारी करून आल्यानंतर आपले पासवर्ड बदलण्याची काळजी घ्या.

माहितीच्या विस्फोटाच्या काळात काहीही लपून राहाणं अवघड होत चाललंय. त्यामुळेच प्रवासात वायफायचा अतिरेकी वापर शक्यतो टाळा आणि आपला डेटा सिक्युअर्ड ठेवा.

Web Title: Avoid use wifi while staying in hotel.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.